बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील रस्त्यांसाठी अनेक नागरिक तक्रारी घेऊन जात आहेत. मात्र शहरातील अनेक रस्ते हे इतक्या वाईट अवस्थेत आहेत की नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र शहरातील रस्त्यांचे काम नगरपालिका करत असल्याने फक्त कागदोपत्री कामांचा विकास होत असल्याचं सतत आरोप होत आहे. आज तर हेच या व्हिडिओने सिद्ध केले आहे.
गणपती विसर्जनाच्या आदल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी नगरपालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मात्र, रस्त्यांना ठिगळ लावणारी नगरपालिका यांचं कागदोपत्री कारभार कसा चालतो, याचा प्रत्यय आमदारांनाच आला. एका कार्यक्राला जात असताना आमदार क्षीरसागर यांची गाडी रस्त्याच्या खड्ड्यात अडकली. काही केल्या आमदारांची गाडी खड्ड्यातून बाहेर निघत नव्हती. शेवटी आमदारांनी गाडी वळवली आणि ते आल्या पावली परत गेले.
मात्र त्यानंतर काही वेळातच शहराची पाहणी करत असलेले पोलीस उपअधीक्षक यांची गाडी देखील त्याच मार्गावर अडकली आणि यावेळेस नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. किमान नागरिकांचं हे विकास पर्व करत नाही मात्र जिल्ह्याला जे चांगले अधिकारी मिळतात, त्यांची तरी काळजी करा अशा आशयाचा व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल झाला. मात्र बीडच्या रस्त्यांची दुरावस्था विकास पर्व नावाच्या ओझ्याखाली आणि कागदोपत्रीच अडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक तर बीड जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळत नाहीत आणि मिळाले तर या अधिकाऱ्यांची देखील ही अवस्था असेल तर बीड जिल्ह्यातील नेते नेमकं करतात तरी काय, हा देखील प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र जेथे आमदाराची गाडी अडकली तेथे सर्वसामान्यांचं काय, हा देखील प्रश्न पुढे येत आहे. आता यावरून बीडच्या स्थानिक नेत्यांनी आणि विकास पर्व नावाच्या बोंबा ठोकणाऱ्या नेत्यांनी बीडचा कसा विकास करायचा आणि किती लवकर करायचा हे त्यांचं त्यांनीच ठरवावं लागेल.