#MataSuperWoman Solapur News: सुरुवातीच्या काळात शेतमजूर म्हणून काम केल्यानंतर वनिता खराडे यांनी गाड्यांच्या चाकांचं पंक्चर काढण्याचा व्यवसाय सुरू केला. २०१० पासून टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक सारख्या वाहनांचं पंक्चर काढण्याचं काम त्यांनी सुरू केलं. वनिता खराडे यांनी सांगितलं, की गरिबी सर्व काही शिकवून जाते, पण या जगात जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. अतिशय अडचणीतून मार्ग काढत त्यांनी आज गॅरेजचा व्यवसाय सुरू केला आहे. पंक्चरसोबत दोन चाकी गाड्यांच्या दुरुस्तीचं कामही त्या करतात. सोलापूर रत्नागिरी हायवेवर, सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्याील तिर्हे गावातील वनिता खराडे यांनी वाहनांचं पंक्चर काढण्याचं काम सुरू केलं. संसार सुरळित चालवण्यासाठी त्यांनी या कामाला सुरुवात करत उत्तुंग भरारी घेतली आहे.

महिला असल्याचा न्यूनगंड कधी ठेवला नाही

पंधरा वर्षापूर्वी वनिता खराडे यांचे पती जाम मिलमध्ये कामाला जात होते. परंतु त्यांच्या तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा सुरळीत चालत नव्हता. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली होती. याचदरम्यान वनिता खराडे या दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला जात होत्या. त्यावेळी फक्त तीस रुपयांच्या आसपास त्यांना या मजुरीचा रोजगार मिळत होता. दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा आणि घरखर्च कसा भागवायचा याची चिंता वनिता खराडे यांना लागली होती.

सोलापूर रत्नागिरी महामार्गावर पंक्चर काढण्याचं दुकान

पतीच्या घरी पूर्वी पंक्चरचा व्यवसाय होता. त्यामुळे पतीला गाड्यांची पंक्चर काढता येत होती. दोघा पती-पत्नीने गाड्यांच्या पंक्चरचं दुकान टाकायचे ठरवून त्यासाठी २०१० मध्ये लहानसा गाळा भाड्याने घेतला. या दुकानावर पंक्चरच्या गाड्यांची संख्या जास्त असायची. त्यामुळे वनिता खराडे यांनी पतीला व्यवसायात मदत करण्याचं ठरवून त्यांनी पंक्चर काढण्याचे काम शिकण्यास सुरुवात केली. सहा महिन्यात वनिता खराडे पंक्चर काढण्याचं काम शिकल्या आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्या सातत्याने पतीला कामात मदत करत राहिल्या. यातून त्यांना महिन्याकाठी २० ते ३० हजार रुपये मिळत होते. त्या कालांतराने ट्रक, जेसीबी, टेम्पो, ट्रॅक्टर या मोठ्या गाड्यांच्या पंक्चर काढण्यास शिकल्या.

सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन केला व्यवसाय

वनिता खराडे आणि त्यांच्या पतीने सुरू केलेल्या पंक्चर दुकानाला हायवेवर मोठा प्रतिसाद मिळाला. हळूहळू व्यवसायात प्रगती केली. त्यासाठी पैशांची गरज भासू लागली. बँकेत जाऊन कर्ज घेण्याची प्रक्रिया माहिती नसल्याने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले आणि पंक्चर दुकानात लागणाऱ्या मशिनरी विकत घेतल्या. त्यांच्या या कामात त्यांना त्यांच्या वडिलांची आणि पतीची मोलाची साथ मिळाली. हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यांनी आज पंक्चरच्या दुकानासोबत टू-व्हीलर दुरुस्तीचं गॅरेजदेखील सुरू केलं आहे. त्यांच्या कामात त्यांना आता मुलाची आणि पतीची मदत मिळत आहे. भाड्याच्या जागेतून त्याच मार्गावर वनिता खराडे यांनी स्वतःची दोन हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेतली. लक्ष्मी टायर्स आणि ऑटोमोबाईलचं दुकान सुरू केलं.

यशस्वी उद्योजिका

सोलापूर रत्नागिरी महामार्गावर तिर्हे गाव असून तिथे २०१० साली सुरुवातीच्या काळात पत्र्याच्या शेडमध्ये पंक्चरचं दुकान सुरू केलं होतं. त्यासाठी अकराशे रुपये भाडं द्यावं लागत होतं. वनिता खराडे यांचं शिक्षण अवघे सहावीपर्यंत झालं आहे. आज त्यांनी पंक्चरच्या व्यवसायात मजल मारली आहे. त्यांना या व्यवसायातून महिन्याला २० ते ३० हजार रुपये मिळत होते. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण आज त्या यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत. हेही वाचा – #MataSuperWoman : गुन्हेगारीचा शिक्का पुसून ३१ मुलांचे भविष्य घडवणारी ‘आई’; पिंकी भोसलेंची प्रेरणादायी कहाणी

पंक्चरच्या व्यवसायातून मुलांना शिकवलं

वनिता खराडे यांनी आयुष्यात संघर्ष करत मोठी झेप घेतली आहे. आज त्यांची मुलं त्यांच्या कष्टामुळे यशस्वी होत आहेत. त्यांच्या मुलाने डिझेल मेकॅनिकलचा कोर्स केला असून तो सध्या स्वतःच्या गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करत आहे. तर मुलगी इंजिनिअरींगचं शिक्षण घेत आहे. त्यांच्या मेहनतीमुळे, जिद्दीमुळे आज त्यांची मुलं यशस्वी होत आहेत. पंक्चर काढण्याच्या दुकानापासून सुरुवात झालेल्या व्यवसायाचं रूपांतर आता गॅरेजमध्ये झालं आहे. त्यांच्या दुकानात टू व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्टदेखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here