मुंबई: गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. शिवसैनिकांना का अटक करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत रविवारी दादर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांशी चर्चा करुन प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. मात्र, हे संपूर्ण प्रकरण ज्या वाटेने जात आहे त्यावरून हा सगळा वाद आणखीन तापण्याची चिन्हे आहेत.

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा आवाज काढत शिवसैनिकांना डिवचले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला होता. मात्र, दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आले होते. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे; गणेश विसर्जन मिरवणुकीतच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने आल्याने तणाव
नेमकं काय घडलं?

अनंत चतुदर्शीच्या दिवशी प्रभादेवी परिसरात रस्त्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांना पाणी आणि सरबताचे वाटप करण्यासाठी शिवसेनेने नेहमीप्रमाणे मंच उभारला होता. याच मंचाच्या बाजूला शिंदे गटातील समाधान सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनीही आपला मंच उभारला होता. शुक्रवारी रात्री मिरवणूक सुरु असताना शिवसैनिक आणि शिंदे गटात बाचाबाची झाली. यावेळी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा काढला. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शनिवारी दिवसभर प्रभादेवी परिसरात तणावाचे वातावरण होते. या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघाले, धर्मवीरांच्या पुतण्याचा हल्लाबोल

गोळीबार वाघावर करतात, शेळ्यांवर नव्हे; शिंदे गटाने शिवसैनिकांना डिवचलं

या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी एक खळबळजनक खुलासा केला होता. शनिवारी मध्यरात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?” पण मीसुद्धा या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा प्रत्येकाला घरातून उचलून नेईन, असे मी शिवसैनिकांना म्हटले. यावेळी तेलवणे यांनी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही फेटाळून लावला. गोळीबार वाघावर करतात, शेळ्यांवर नव्हे, अशा शब्दांत तेलवणे यांनी शिवसैनिकांना डिवचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here