Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 11, 2022, 2:24 PM
Antibiotics Medicine : देशात अँन्टिबायोटिक्स निष्प्रभ ठरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक रुग्णांवर यापुढे ‘कार्बापेनेम’ या अत्यंत प्रभावी अँन्टिबायोटिक्स औषधाचा परिणाम होणार नसल्याची भीती ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

‘कार्बापेनेम’ हे एक शक्तिशाली अँन्टिबायोटिक्स औषध आहे, जे प्रामुख्याने अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या न्युमोनिया आणि रक्तदोष (सेप्टिसेमिया) असलेल्या रुग्णांना दिले जाते. ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कामिनी वालिया यांच्या नेतृत्वाखाली १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत गोळा करण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. ‘आयसीएमआर’चा हा अभ्यास अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. विश्लेषणात असे आढळून आले की, औषधाला निष्प्रभ करणाऱ्या ‘पॅथोजेन्स’च्या (जंतू) संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी काही संक्रमणांवर उपलब्ध औषधांच्या मदतीने उपचार करणे कठीण झाले आहे. ताबडतोब योग्य पावले उचलली नाहीत, तर सूक्ष्मजीवविरोधी प्रतिकारशक्तीचा विकास नजीकच्या भविष्यात साथीच्या रोगाचे रूप घेऊ शकतो, अशी भीती डॉ. वालिया यांनी व्यक्त केली.
देशातील अँन्टिबायोटिक्स निष्प्रभ ठरण्याच्या (एएमआर) ट्रेंड्स आणि नमुन्यांबाबत ‘आयसीएमआर’द्वारे जाहीर करण्यात आलेला हा पाचवा तपशीलवार अहवाल आहे. यावर्षीच्या अहवालात रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीचाही समावेश आहे. ‘ई कोलाय’ जीवाणूमुळे होणाऱ्या संक्रमणावर उपचारासाठी वापरले जाणारे इमिपेनेम हे औषध निष्प्रभ ठरण्याचे प्रमाण सन २०१६ मध्ये १४ टक्के होते, ते सन २०२१ मध्ये ३६ टक्क्यांवर पोहोचले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बानकुळेंच्या स्वागतासाठी नाशकात बाईक रॅलीचं आयोजन, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.