मुंबई: गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याचे प्रकरण आता आणखी चिघळले आहे. या राड्यानंतर शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आणखी दोनदा आमनेसामने आले. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तुलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसांकडून सदा सरवणकर यांचे पिस्तुल ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय, समाधान सरवणकर आणि इतर कार्यकर्त्यांवरही क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता यानंतर सदा सरवणकर आणि शिंदे गट कोणते पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी गोळीबार केलेला नाही. मी शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मी केवळ परिस्थिती शांत करण्यासाठी प्रभादेवीला गेलो होतो. माझी कितीही बदनामी केलीत तरी मी त्याला माझ्या कामातून प्रत्युत्तर देईन, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.

सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; सरवणकरांनी आरोप फेटाळले

शिवसैनिकांचा नेमका आरोप काय?

इकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी स्वत: रात्री पोलीस ठाण्यात आलो होतो. मी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु घडलेल्या प्रकारानंतर पोलीस अधिकारीसुद्धा काळजीत होते, ते भयभयीत झाले होते, असा प्रकार यापूर्वी आम्ही कधीही बघितला नव्हता, असे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले.
Shivsena: ‘सदा सरवणकरांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी पोलिसाला लागली असती’, अखेर गुन्हा दाखल

शिंदे गटाला भिडणारे शिवसैनिक जेलमधून सुटून थेट मातोश्रीवर

दादर पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली होती. पोलिसांनी या सगळ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय, आणखी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना पक्ष प्रचंड आक्रमक झाला होता. अखेर या शिवसैनिकांना रविवारी जामीन मिळाला. त्यानंतर हे पाच शिवसैनिक थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंनी त्या शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली. कोणी आमच्या अंगावर आले तर, आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया यावेळी महेश सावंत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here