शिवसेना आणि शिंदे गटात राडा

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा आवाज काढत शिवसैनिकांना डिवचले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला होता. मात्र, दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आले होते. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.
शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा

दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. याविरोधात शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली होती. रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेनेच बडे नेते एकापाठोपाठ एक दाखल होताना दिसत आहेत. शिवसैनिकांवरील अटकेच्या कारवाईविरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सर्वप्रथम दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले. अरविंद सावंत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवेही हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला.
शिवसैनिक मातोश्रीवर

या पाच शिवसैनिकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे आणि शिवसैनिकांमध्ये शनिवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाला होता. शिवसैनिक आपल्याला मारहाण करण्यासाठी आले होते, असे संतोष तेलवणे यांनी म्हटले. त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर हे सर्वजण थेट मातोश्रीवर दाखल झाले. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. परंतु, त्यांना संयम बाळगण्याचाही सल्ला दिला.
शिवसैनिक

शिंदे गटाला भिडणारे हे पाच कायकर्ते मातोश्रीवर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला. आता हा वाद आणखी किती चिघळणार हे पाहावे लागेल. पोलिसांनी आता या प्रकरणात सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.
शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे गट

दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसैनिकांच्या एका गटाने दादर परिसरातील समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात केली आहे. याशिवाय, समाधान सरवणकर यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दादरमधली वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर

या सगळ्या राड्यानंतर शिवसैनिक सरवणकर पिता-पुत्रांविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी दादरमधील समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडले. काही ठिकाणी त्यांच्या बॅनर्सवर दगडफेक केली. त्यामुळे आता शिंदे गट या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. समाधान सरवणकर यांनी विसर्जनाच्या दिवशी म्याव-म्यावच्या घोषणा देऊन शिवसैनिकांना डिवचले होते. त्यामुळे या सगळ्या वादाला तोंड फुटले होते. तेव्हा आता हे प्रकरण आणखी किती चिघळणार, हे पाहावे लागेल.