नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात आज चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भाषणाची संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराची राज्यभर जोरदार चर्चाही रंगत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच अजित पवार निघून गेले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘एखादी व्यक्ती लघुशंकेसाठी गेली, तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. शरद पवारसाहेबांचं शेवटचं भाषण होतं. त्यांच्याच भाषणाची सर्वजण वाट पाहात होते. त्यामुळे आम्ही सर्वजणच भाषणाला नाही म्हणत होतो. मात्र त्यानंतर माझं भाषण सुरू असताना अजित पवार हे लघुशंकेला जाऊन आले. त्यामुळे या गोष्टीचा इतका मोठा गोंधळ करण्याची आवश्यकता नाही. अजित पवार अजिबात नाराज नाहीत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल असल्याचा दावा केला आहे.

सरवणकरांकडून गोळीबार? ते लव्ह जिहादचा दावा नवनीत राणांच्या अंगलट; वाचा, मटा ऑनलाइनच्या टॉप टेन न्यूज

अजित पवार यांनी काय म्हटलं?

‘राष्ट्रवादी काँग्रेसचं हे राष्ट्रीय अधिवेशन होतं. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील विविध मान्यवरांनी भाषणं केली. महाराष्ट्रातून छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपले विचार मांडले. लक्षद्वीप, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ असा विविध राज्यातील मान्यवर या अधिवेशनासाठी आले होते. हे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातील अधिवेशन नव्हतं. हे राष्ट्रीय अधिवेशन होतं. त्यामुळे मी भाषण केलं नाही. सर्वांची उत्सुकता होती, मात्र जे काही बोलायचं ते मी महाराष्ट्रात बोलेन,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अधिवेशनात झालेल्या या प्रकारावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आगामी काळात काही भाष्य केलं जातं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here