Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Sep 11, 2022, 11:23 PM

Asia cup 2022 final : श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज भानुका राजपक्षाने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावले आणि संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवता आले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्यामुळेच श्रीलंकेचा संघ यावेळी चांगली कामगिरी करू शकल्याचे पाहायला मिळाले.

 

asia cup
सौजन्य-ट्विटर
दुबई : श्रीलंकेने तब्बल आठ वर्षांनी आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी त्यांनी २०१४ साली आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी हे जेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने भामुका राजपक्षाच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर १७१ धावांचे आवव्हान पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या धावसंख्येला यावेळी खीळ बसवता आली. पाकिस्तानचा बाबर आझम हा श्रीलंकेच्या विजयाच्या मार्गात अडसर बनू पाहत होता.त्याने ५५ धावांची खेळीही साकारली. पण श्रीलंकेच्या डीसिल्व्हाने त्याला बाद केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. श्रीलंकेसाठी हा एक मोठा विजय ठरला. कारण यजमान असूनही त्यांना या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्याचबरोबर या विजयाचा मोठा परीणाम त्यांच्या संघावर होईल आणि याचा फायदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच होऊ शकतो.

श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज भानुका राजपक्षाने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावले आणि संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने तर यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्याच्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. रौफला पाकिस्तानच्या अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. पण भानुकाने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत श्रीलंकेचा एकाकी किल्ला लढवला आणि नाबाद ७१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवता आले.

फायनलच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. नसीम शाहच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरच कुशल मेंडिस बोल्ड झाला आणि श्रीलंकेला पहिला धक्का बसला. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का होता. कारण कुशल हा चांगल्या फॉर्मात होता, पण या सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम खानने यावेही हा पहिला विकेट मिळवला. त्यानंतर चौथ्या षटकात पुन्हा एकदा श्रीलंकेला धक्का बसला. श्रीलंकेसाठी हा दुसरा धक्का होता आणि त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर फक्त २३ धावांत गमावले होते. श्रीलंकेचे एकामागून एक विकेट पडत होते. पण त्याचवेळी श्रीलंकेचा भानुका राजपक्षे हा खेळपट्टीवर ठाम मांडून उभा होता. विकेट पडत असले तरी त्याला काही फरक पडत नव्हता. कारण तो फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत होता. भानुकाने यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि आपले अर्धशतक साकारले. भानुकाच्या अर्धशतकाच्या जोरावरच श्रीलंकेला यावेळी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here