औरंगाबादच्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी ही सभा आयोजित केली आहे. मात्र या सभेआधीच राजकारणाला जोरात सुरुवात झाली आहे. सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तसेच सभेला उपस्थित राहण्यासाठी काही जणांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या दोन कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या साऱ्या प्रकारानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले.
अजित पवार म्हणाले…
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पैठण दौरा आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आदेश काढले गेलेत. जर अंगणवाडी सेविका सभेला गेल्या मग मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांच्या शाळेचं काय होणार? गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही परिस्थिती आली असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आम्ही पण सत्तेत होतो, पण अशा प्रकारचे आदेश कधीच काढले नाहीत”.
“आता या साऱ्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलं, तर आम्ही आदेश काढले नाहीत, सचिवांनी वगैरे आदेश काढले, असं उत्तर ते देतील. पण मला त्यांना सांगायचंय, सत्तेत आम्हीही होतो. परस्पर आदेश कुणी काढू शकत नाही, आपण काय वागतो, याचं भान असलं पाहिजे”, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं.
मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनावर टीका
“राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या माणसाने किती काळ दर्शन घेत फिरायचं, याचं पण एक प्रमाण असतं. याअगोदरही गणेशोत्सव व्हायचे ना… आम्ही पण दर्शनाला एकमेकांकडे जायचो. पण यंदा काय झालं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मी नास्तिक नाहीये. परंतु महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने दर्शनात किती काळ घालवायचा, याला काही बंधनं असतात”, अशा शब्दात अजितदादांनी
मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनावर टीका केली.