भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या प्रकरणात गेले वर्षभर केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हे रिसॉर्ट तोडावे व अनिल परब यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी वेळोवेळी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळयांचे साई रिसॉर्ट हे स्मारक तुटणार व सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल परब यांना दयावी लागतील असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
अवघ्या राज्यात बहूचर्चीत व वादग्रस्त ठरलेल्या अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या साई रिसॉर्ट व सी काँच रिसॉर्ट पडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु झाली आहे. चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मौजे मुरूड ता. दापोली येथील स.नं. ४४६ मधील साई रिसॉर्ट एनएक्स व सी. कौंच रिसॉर्ट बांधकामा व इमारती करिता पुरविलेल्या सोईसुविधा निष्कासन करणे व त्यानुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर सामग्री योग्यरितीने गोळा करून विल्हेवाट लावणेसाठीचे व वापरात येणाऱ्या साहित्यांचे मूल्यांकन करणे, तसेच स.नं. ४४६ मध्ये अस्तित्वात असलेल्या इमारती व इतर बाबी सविस्तर नकाशे (Drawing) ५ प्रतीत तयार करून त्याला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे याकरिता योग्य त्या सल्लागाराची नियुक्ती करणेकरीता दरपत्रक मागविणेत आले आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी याप्रकरणात आपला कोणताही सबंध नसल्याचे स्पष्ट केले असून किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी या सगळ्या प्रकरणी ईडीकडूनही अनिल परब व काही जणांची चौकशी करण्यात आली होती.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times