अमरावती- बडनेरा शहरात दुपारी १२ पासून पाऊस टप्याटप्प्याने आला. चांदूर रेल्वे येथे जोरदार पावसाने आठवडी बाजाराचे नुकसान झाले. भातकुली तालुक्यात टाकरखेडा शंभू अचलपूर, पुरातही मुसळधार पाऊस कोसळला. चांदूर बाजारात मुसळधार पावसाची नोंद झाली. दर्यापूर, येवदा व परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने बॅटिंग केली. शिरजगाव कसबा येथील गणेश विसर्जन सोहळ्यात पावसाचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे दुपार पासूनच अंधाराचे सावट होते. अंजनगाव सुर्जी येथे दिवसभरापासून पाऊस भन्नाट कोसळत होता. ढगांच्या दाटीने दुपारी ४ वाजताच अंधार पसरला. तथापि, या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.
ढगफुटीसदृश पावसामुळे तीन गावामध्ये शिरले पाणी
धामणगाव रेल्वे तालुक्याला रविवारी सहाव्यांदा अतिवृष्टीने झोडपले. आठ गावांमध्ये ९० मिमीपेक्षा अधिक ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. ११ घरांची पडझड झाली तर तीन गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यात विरुळ रांधे, वाघोली, गुंजीचा समावेश आहे. विदर्भ, मोती कोळसा, वर्धा नद्या फुगल्याने तालुक्यातील अनेक मार्गावर वाहतूक बंद झाली होती.