सिडनी: ऑस्ट्रेलियात एका जंगली कांगारूच्या हल्ल्यात ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीनं हौस म्हणून कांगारू पाळला होता. पश्चिम ऑस्ट्रेलियातील रेडमंडमधील एका शहरात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिली. कांगारूनं दिवसा हल्ला केल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

वृद्धाचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी एक कांगारू होता. रुग्णवाहिकेसोबत आलेलं वैद्यकीय पथक मृतदेहाजवळ जाऊ पाहात होतं. मात्र कांगारू त्यांना मृतदेहाजवळ जाऊ देत नव्हता, अशी माहिती प्रवक्त्यानं दिली. मृताची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. त्याच्या नातेवाईकानं सर्वप्रथम गंभीर जखमी अवस्थेत असलेला मृतदेह पाहिला आणि याची माहिती पोलिसांना दिली.
वाढदिवसालाच मृत्यूनं गाठलं! ४ वर्षीय चिमुकलीचा बसमध्ये तडफडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा
आपत्कालीन पथकाच्या कामात कांगारूमुळे अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याला मारण्याचे आदेश पोलिसांना मिळाले होते. वन्य प्राणी असलेला कांगारू मृत व्यक्तीनं पाळला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. वृद्धावर हल्ला करणारा कांगारू नेमका कोणत्या प्रजातीचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पश्चिम ऑस्ट्रेलियात वेस्टर्न ग्रे प्रजातीच्या कांगारूंची संख्या अधिक आहे. या कांगारूंची उंची साधारणत: सात फुटांच्या आसपास असते. त्यांचं वजन ७० किलोपर्यंत असतं. अशा प्रकारचा हल्ला याआधी ऑस्ट्रेलियात १९३६ मध्ये झाला होता, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.
वाहतूक कोंडीत अडकली कार; डॉक्टर ४५ मिनिटं धावले; सर्जरी करून रुग्णाला जीवनदान
१९३६ मध्ये सिडनी एका ३८ वर्षीय व्यक्तीवर कांगारूनं हल्ला केला होता. विल्यम क्रूइकशँक असं या व्यक्तीचं नाव होतं. विल्यमला न्यू साऊथ वेल्समधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. कांगारूंच्या तावडीतून दोन कुत्र्यांची सुटका करण्याचा प्रयत्न विल्यम करत होते. तेव्हा त्यांच्यावर एका मोठ्या कांगारूनं हल्ला केला. त्यांच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर इजा झाली. त्यात विल्यम यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here