co pilot ends life: नैऋत्य दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये को-पायलटचा मृतदेह सापडला आहे. ३२ वर्षीय तरुण एका खासगी विमान कंपनीत को-पायलट होता. पोलिसांना घटनास्थळी हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येचं असावं असा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. को-पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पायलटचे वडील शनिवारपासून त्याला कॉल करत होते. मात्र त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी घर मालकाला फोन केला. मालकानं घराच्या खिडकीतून आत वाकून पाहिलं. त्यावेळी त्याला को-पायलट जमिनीवर पडलेला दिसला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, को-पायलटच्या फ्लॅटमध्ये दारूची रिकामी बाटली आढळली. याशिवाय प्लास्टिकच्या एका बाटलीत लिक्विड सापडलं. को-पायलटचे पाय साखळीनं बांधलेले होते. ही साखळी कोड डिव्हाईसनं लॉक करण्यात आली होती. को-पायलटच्या तोंडावर टेप होती. तपासासाठी गेलेल्या पोलिसांनी को-पायलटच्या तोंडावरील टेप काढली. तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर आला. सिम्युलेटर चाचणीत नापास झाल्यानं को-पायलट तणावाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्लास्टिकच्या बाटलीत विष असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.