नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे शुक्रवारी रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी दिगंबर काकडे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी खबऱ्यांमार्फत पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली.
या माहितीच्याआधारे पोलिसांनी बालाजी काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधवला अटक केली. चौकशीदरम्यान त्याला पोलिसी खाक्या दाखवताच या खून प्रकरणाचा उलगडा झाला. चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे भाचा एकनाथ बंडू जाधव याने मुलीचा हात मागितला होता. यावेळी ‘तू काही काम करत नाहीस’, असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला. मामा मुलगी देत नसल्याचा राग मनात ठेवून भाच्याने मामालाच संपविले. सदर खून प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आदींनी तपास घेऊन भाचा एकनाथ बंडू जाधव (वय १९) वर्ष यास अटक केली. पोलिसांनी खाकीचा हात दाखवताच एकनाथ याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. ५० तासांनी आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.