म. टा. वृत्तसेवा, सटाणाः गर्भवती आदिवासी महिलेला उपचार नाकारतानाच, तिला दाखल करून घेण्यासही नकार दिल्याने प्रवेशद्वारावरच संबंधित महिलेची प्रसूती होऊन नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना सटाणा ग्रामीण रुग्णालयात घडली. मंगळवारी (ता.१३) सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रुग्णालयाला कुलूपच ठोकले. महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात अल्पवयीन युवतीचा अवैध गर्भपात करण्यात आला होता. या प्रकरणी कंत्राटी तत्त्वावरील स्त्री रोग तज्ज्ञाला निलंबित करून गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

जुनी शेमळी येथील मनीषा समाधान सोनवणे या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला कळा येत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. परंतु, वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण सांगून तिला मालेगाव किंवा कळवण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. आपल्याला प्रचंड वेदना होत असून, प्रकृती बिघडली असल्याची विनंती महिला तसेच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना केली. परंतु, कुणीही दाद दिली नाही, असा आरोप केला जात आहे. या दरम्यान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिला प्रसूत झाली. काही वेळातच नवजात अर्भकही दगावले. यामुळे नातेवाइक तसेच गावकरीही संतापले.

सरपंच संदीप बधान तसेच माजी आमदार संजय चव्हाण, मनोज सोनवणे, निखिल खैरनार, अनिल पाखले आदी दाखल झाल्यानंतर रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक दाखल होत नाहीत, तोपर्यंत टाळे न उघडण्याची भूमिका त्यांनी घेतली. नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आज, बुधवारी शल्यचिकित्सक दौरा करणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here