Vedanta Foxconn Semiconductor Plant: भारतीय कंपनी वेदांत आणि तायवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनचा १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लाँट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन या जॉइंट वेंचरचं डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेमिकंटक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात १००० एकर क्षेत्रात स्थापित केलं जाईल. या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांची भागीदारी ६० आणि ४० टक्के इतकी असेल. राष्ट्रवादी काँग्रेसने शेजारच्या भाजपशासित राज्यावर महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या हातातून एक मोठा प्रकल्प निसटला असून एक लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक बुडाली असल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्राला कसं झालं नुकसान?

गुजरातमध्ये हा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारल्यानंतर जवळपास १ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी सांगितलं. या दोन्ही कंपन्यांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असंही ते म्हणाले. परंतु हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राताला मोठं नुकसान झालं असून नोकरीच्याही अनेक संधी हुकल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने १ लाख नोकऱ्याही महाराष्ट्रातून बाहेर गेल्या. महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली असती, स्थानिक इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला मोठं प्रोत्साहन मिळालं असतं.

प्लाँट महाराष्ट्रातच होणार असल्याचं निश्चित होतं, पण…

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार असताना हा प्रकल्प जवळपास महाराष्ट्रातच उभारला जाणार असल्याचं निश्चित असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडी सरकार कंपनीच्या संपर्कात होतं आणि यावर्षी जानेवारीमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठकही झाली होती. परंतु आता हा प्लाँट गुजरातमध्ये गेला असताना सरकार काय करत आहे? उद्योगमंत्री काय करत होते असं म्हणत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने २६ जुलै रोजी हा प्लाँट महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याचं ट्विट केल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन

वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करुन या डीलबाबतची माहिती दिली आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून स्थापित करण्यासाठी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले आवश्यक आहे. वेदांत ग्रुप आणि तायवानची कंपनी फॉक्सकॉनसह मिळून सेमीकंडक्टर प्रोडक्शनसाठी गुजरातमध्ये प्लाँट उभारण्यात येत आहे. हा भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लाँट असणार आहे. यासाठी गुजरात सरकारसह दोन मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग (MoUs) साइन केलं आहे. या प्रोजेक्टसाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गुजरातमध्ये उभारला जाणार सेमीकंडक्टर प्लाँट

यावर्षी फेब्रुवारीमध्ये वेदांतने फॉक्सकॉनसह जॉइंट वेंचरसाठी हातमिळवणी केली होती आणि भारत सरकारच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग योजनेसाठी अर्ज केला होता. या संयुक्त उपक्रमात वेदांताचा ६० टक्के आणि फॉक्सकॉनचा ४० टक्के हिस्सा आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे पुढील दोन वर्षात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लाँट सेटअप करणार आहे. यावर्षी जुलैमध्ये गुजरात सरकारने सेमीकंडक्टर पॉलिसी २०२२-२७ जाहीर केली होती. याअंतर्गत सरकारने राज्यात सेमीकंडक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा राज्यात डिस्प्ले फॅब्रिकेशन उत्पादनामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी वीज, पाणी आणि जमीन शुल्कावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

सेमीकंडक्टरची मोठी टंचाई

गेल्या वर्षी सेमीकंडक्टरची मोठी टंचाई देशात निर्माण झाली होती. याचा फार मोठा फटका वाहन उद्योगाला बसला होता. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती. यामध्ये उत्पादनसंलग्न सवलत योजनाही (पीएलआय) लागू करण्यात आली होती. याचा फायदा घेऊन सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी वेदान्त-फॉक्सकॉन यांनी संयुक्त अर्ज केला होता.

वेदांत-फॉक्सकॉनला महाराष्ट्राने काय दिलं होतं?

महाविकास आघाडी सरकारकडून वेदांत – फॉक्सकॉनला ३९ हजार कोटींची सवलत देण्यात आली होती. २० वर्षांसाठी रोज ८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा, स्टँप ड्युटीमध्ये ५ टक्के सूट देण्यात आली होती. वीज दरात १० वर्षांसाठी साडेसात टक्के सूट, तळेगावमधील ४०० एकर जागा मोफत दिली होती. तसंच ७०० एकर जागा ७५ टक्के दराने दिली होती. १२०० मेगावॅटचा अखंडित पुरवठा २० वर्षांसाठी ३ रुपये प्रति युनिट दराने देण्यात आला होता. पाणीपट्टीत ३३७ कोटी रुपयांची सूट, घनकचरा प्रक्रियेवर ८१२ कोटींची सूट देण्यात आली होती.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?

महाराष्ट्र सोडून फॉक्सकॉनने प्रकल्पसाठी गुजरातची निवड का केली? असा रोकडा प्रश्न कालपासून विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारला विचारत आहे. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. सेमी कंडक्शन धोरण असलेलं गुजरात एकमेव राज्य असल्याने फॉक्सकॉनने प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गुजरात सरकारने सेमी कंडक्शन धोरण बनविलं, असं धोरण बनवणारं देशातलं एकमेव राज्य. या धोरणांअंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रिक मिशन स्थापन केलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्याची मान्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली. गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारीपासून गुंतवणुकीसाठी तयार होतं. या पॉलिसीमुळे सेमी कंडक्टर बनविणाऱ्या कंपन्यांनी गुजरात सरकारशी संपर्क साधला. शिंदे सरकार स्थापनेच्या आधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर शेवटचची बैठक संपन्न झाली होती. एमओयूवर सह्या करण्याची औपचारिक प्रक्रिया काल पार पडली.

काय आहे फॉक्सकॉन कंपनी?

अहमदाबादमध्ये १००० एकर जमिनीवर हा प्लाँट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टमधून जवळपास १ लाख रोजगारही उपलब्ध होतील. प्रस्ताविक सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन युनिट २८ nm टेक्नोलॉजी नोड्सवर काम करेल. फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहेत. फॉक्सकॉन ही तायवानची कंपनी आहे. परंतु आता फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करत आहे, कारण तायवानचे चीनशी असलेले संबंध खराब झाल्यानंतर या कंपनीचं लक्ष भारतावर अधिक आहे.

फॉक्सकॉनची भारतात मोठी गुंतवणूक

या जुलैमध्ये फॉक्सकॉन आणि वेदांत ग्रुपमध्ये करार झाला होता, ज्याअंतर्गत महाराष्ट्रात दोन्ही कंपन्या मिळून २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करतील. यावर्षाच्या सुरुवातीला वेदांत ग्रुपने फॉक्सकॉनसह आणखी एक करार केला होता. त्यानुसार भारतात पुढील १० वर्षात सेमीकंडक्टर चीप आणि डिस्प्ले बनवनण्यावर १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल. तायवानी कंपनी फॉक्सकॉन भारतात आधीपासूनच काम करत आहे. फॉक्सकॉनचे भारतात तीन प्लाँट असून दोन प्लाँट तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात सुरू आहेत. या दोन्ही प्लाँटमध्ये अॅपल, शाओमी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here