मुंबई : वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरुन महाराष्ट्रात रान पेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांत फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला लवकरच मिळेल, असं आश्वासन दिलं आहे. ‘वेदांता’ ग्रुप आणि तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचं वृत्त आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत त्यांना बोचरे सवाल विचारले होते. ज्यानंतर रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी ‘फॉक्सकॉन’ यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून, तो आता गुजरात राज्यात साकारेल. यासाठी झालेल्या करारावर मंगळवारी गुजरात सरकारतर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली. एकूण १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन बातचित केली. दोघांमध्ये वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा झाली. गेल्या काही दिवसांतील घडामोडींच्या अनुषंगाने ही चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातल्या उद्योगांमध्ये केंद्राचं सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलंय. राज्य सरकारही मोठा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला दिल्लीला जाऊ”, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मविआ नेत्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? आतापर्यंतची सर्वांत मोठी माहिती समोर
पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदेंना काय म्हणाले?

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा, असं म्हणत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्याला तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिंदे-मोदी यांच्या संभाषणात देखील या विषयावर चर्चा झाली. मोदींनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची री ओढली.

“मागच्या सात-आठ महिन्यामध्ये उद्योजकांना जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता, तो न मिळाल्याने कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण महाराष्ट्राने काळजी करु नये, वेदांत फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला लवकरच मिळेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? उद्धव ठाकरेंवर खापर फोडत एकनाथ शिंदे म्हणाले..
मुख्यमंत्री-पंतप्रधान मोदी यांची फोनवरुन चर्चा

फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास दीड लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या आहेत. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल रात्रीच्या सुमारास फोन केला. त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधत ‘वेदांता’ ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली. तसेच आगामी काळातले मोठे उद्योग आणि प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे, आपण ते सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here