आस्था त्यागी यांनी अनिल अग्रवाल आणि केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचा एक फोटो शेअर केला आहे. ‘सेमीकंडक्टर प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी माझे बॉस अनिल अग्रवाल सर आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा हा कँडिड फोटो क्लिक केला. सरांच्या मनात अस्वस्थता आणि धाकधूक होती. त्यामुळे त्यांना विमानात फारशी झोपच लागली नाही,’ असं आस्था त्यागी यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
या क्षणाचा साक्षीदार होण्याचं, त्याचा एक भाग होण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद आहे. आता भारतात सेमीकंडक्टर्सची निर्मिती सुरू होईल. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणं स्वस्तात उपलब्ध होतील. याशिवाय रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होतील, अशा भावना आस्था त्यागी यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
वेदांता समूहानं मंगळवारी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली. यासाठी समूहानं गुजरात सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. वेदांता समूह अहमदाबादमध्ये सेमीकंडक्टर फॅब युनिट, डिस्प्ले फॅब युनिट आणि सेमीकंडक्टर ऍसेब्लिंग आणि टेस्टिंग युनिटची उभारणी करणार आहे. यासाठी कंपनी १,५४,००० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामुळे जवळपास १ लाख रोजगार तयार होतील.