snake catcher dies of cobra bite: राजस्थानच्या चुरूमध्ये एका व्यक्तीला कोब्रा सापानं दंश केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. विनोद तिवारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विनोद तिवारी सर्पतज्ज्ञ होते. सापाला हाताळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी होता. २० वर्षांपासून ते साप हाताळत होते. अनेकदा त्यांनी सापांची यशस्वी सुटका केली होती.

सापानं दंश केल्याचं विनोद तिवारी यांना जाणवलं. आज खूप वाईट पद्धतीनं दंश केलाय, असं तिवारी म्हणाले. तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले. सर्पदंशानंतर तिवारी उठून उभे राहिले. त्यांना सापाची पिशवी बाजूला ठेवली आणि तिथून निघाले. विनोद तिवारी यांना अस्वस्थ वाटत असल्याचं फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विनोद तिथून निघाले. काही अंतर चालले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
विनोद तिवारी यांना सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच त्यांची पत्नी आणि मुलगा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिवारींना रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ४५ वर्षांचे विनोद जीव्हीएम संस्थेत कामाला होते. माळीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम ते करायचे. विनोद यांनी अनेक सापांची सुटका केली. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले. त्यामुळे समाजसेवी संस्थांनी त्यांना सन्मानितही केलं होतं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.