रत्नागिरी : वेदांत-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे गदारोळ सुरू असतानाच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातला रिफानरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात नेला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. याआधी नाणार येथे विरोध झाल्याने ती जागा रद्द करण्यात आली होती. आता बारसू परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र सर्व्हेला होत असलेल्या विरोधामुळे कंपनीचं काम रखडलं आहे. त्यामुळे आता रिफायनरी उद्योगही राज्याबाहेर जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
राजापूर धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण पूर्ण होण्यास विरोधकांचा अडसर आणि प्रशासनाच्या गुळमुळीत भूमिकेमुळे कंपनी नाराज आहे. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प २०१८ सालापासून रखडलेला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प ६० मिलियन मॅट्रिक टनाचा होता. आता विलंबामुळे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प २० मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा प्रस्तावित आहे. रिफायनरीचा पहिला प्रकल्प ३ लाख कोटींचा होता, परंतु आता विलंबामुळे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.