रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार योगेश कदम अ‍ॅक्शन मोडवर असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी कदम यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत आमदार योगेश कदम यांनी रणशिंग फुंकलं असून १८ सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी मेळावा घेण्याचं निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मेळाव्याला माजी मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम उपस्थित राहणार आहेत.

कोकणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा होत आहे. १६ सप्टेंबर रोजी त्यांची दापोली आणि रत्नागिरी येथे जाहीर सभा होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दापोलीतील या सभेची तयारी माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत.

शिरुर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार? आढळरावांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह!

दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याच ठिकाणी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचीही सभा होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला ठिकाणीच सभा घेऊन जशास तसे उत्तर देण्याची रणनीती कदम यांच्याकडून ठरवण्यात आली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सभेत नेमकी काय भूमिका मांडतात आणि त्याला रामदास कदम, उदय सामंत काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here