काळा जरकीन खाकी पॅन्ट घालून करत होता वसुली
संशयित आरोपी होमगार्ड नरेंद्र आयवळे हा होमगार्डचा ड्रेस आणि त्यावरती काळा जरकीन घालून मी पोलीस आहे, अशी भिती दाखवून वाहने अडवत होता. वाहनांची कागदपत्रे, आरसी बुक आणि लायसन्स दाखव नाहीतर ५०० रूपये काढ, असे सांगत ५०० रूपये घेत होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या शेंगा फुटाणे व आईस्क्रीम विक्री करणाऱ्या व्यक्तींजवळ जावून तुम्ही येथे गाडी लावायची नाही, तुम्हाला जर येथे गाडी लावायची असेल तर माझ्याकडे ५०० रूपये दंड भरावे लागेल, असे म्हणून त्यांच्याशी वाद घालत असे. तसेच त्यांच्याकडून २०० रूपये दंड देखील घेत असे. आयवळे यांने दोन्ही ठिकाणी पैसे घेतले पण शासनास प्रदान केलेली पावती दिली नव्हती.
वाहनधारक व फेरीवाल्यांना संशय आला
पोलिसासारखा दिसणारी ही व्यक्ती पोलीस नसल्याचा संशय आल्याने नागरिकांनी फोन करून फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील बिटमार्शल यांना सोलापूर शहरातील सेवासदन शाळेजवळ बोलावून घेतले. बिट मार्शल हे घटनास्थळी येवून या व्यक्तीची चौकशी केली असता तो पोलीस नसून नरेंद्र आयवळे नावाचा होमगार्ड असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली.
पोलीस नसताना पोलीस असल्याची भिती घालून वाहनधारकांना व शेंगा फुटाणे व आईस्क्रीम विक्री करणाऱ्याकडून रक्कम घेतली म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात होमगार्ड विरोधात भा.द.वि. ३४८ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार चौगुले करीत आहेत.