जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता बकाले याच्याविरोधात गुरुवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

किरणकुमार बकाले याच्याविरोधात विनोद पंजाबराव देशमुख (वय ४९ वर्ष, व्यवसाय बांधकाम व्यावसायिक, रा. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की, मी जळगाव जिल्हा पोलीस दलास व दलातील बऱ्याचशा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना ओळखतो. त्यापैकी किरणकुमार बकाले याला व्यक्तीश: ओळखतो. त्याची व माझी लहान मोठ्या कार्यक्रमात भेट झाली आहे. तसंच स.फौजदार अशोक ओंकार महाजन नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सुद्धा ओळखतो. ते स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे हजेरी मेजर म्हणून कर्तव्य पार पाडीत आहे. दरम्यान, एका व्हाटसअप ग्रुपवर १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली. या क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने त्याचे सहकारी पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्याशी कामानिमीत्त चर्चा करत असताना मराठा समाजाबददल आक्षेपार्ह, घृणास्पद व स्त्रियांना लाज वाटेल असे बोलून मराठा समाजातील सर्व स्त्री-पुरुष व लहान थोरांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलं आहे. बकाले हा सरकारी नोकर व जबाबदार पदावर असताना आपल्या सहकारी अंमलदारांशी फोनवर बोलताना ‘मराठा समाजाबद्दल’ अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला व अशा वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झालेला आहे, असे विनोद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

जुलै २०२१मध्ये चिपळूणमध्ये आलेला पूर नेमका कोणत्या कारणामुळे? अहवालातून समोर आलं खरं कारण

दरम्यान, या तक्रारीवरुन किरणकुमार बकाले याच्याविरुद्ध भादवी कलम १५३ अ, १५३ ब, १६६.२९४,५००,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही केला होता संताप

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्यावर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला होता. पाचोरा येथील मेळाव्यात भाषणातून अजित पवार यांनी “हा कोण बकाले नावाचा माणूस, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, पोलीस ऑफिसर असला म्हणजे काय झालं, त्याला काय शिंगं आली काय, का त्याला मस्ती आलीय” अशा शब्दात अजित पवार यांनी आपला रोष व्यक्त केला होता.

पाचोरा पोलीस निरीक्षकांकडे एलसीबीचा अतिरिक्त कार्यभार

स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याचे निलंबन झाले. या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाचोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेशही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पारीत केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत नियमित नेमणूक आदेश होईपर्यंत पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळून स्थानिक गुन्हे शाखेचेही कामकाज सांभाळावं, असं आदेशात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here