Lalbaugcha Raja Mandal Auction: यंदा गणेशोत्सव थाटामाटात पार पडला. दोन वर्ष करोनामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अनेक निर्बंध होते. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र यंदा बाप्पाचं वाजत-गाजत आगमन झालं आणि बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोपही देण्यात आला. मुंबईतील गणेशोत्सवात सर्वात आकर्षणाचं केंद्र असलेल्या लालबागच्या राजाचा आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने राजाच्या चरणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लालबाग राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याशिवाय अनेकांनी लालबाग राजाच्या चरणी मोठं दानही केलं आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांनी सोनं-चांदी दान केलं आहे. बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आता भाविकांनी दिलेल्या दानाचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात अनेकांनी बोली लावली असून यातून मंडळाने १.२५ कोटी रुपये कमावले आहेत. तर एकूण कमाई ६.२५ कोटी रुपये इतकी झाली आहे.

लालबागचा राजा दान लिलाव

लालबाग राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळवे यांनी सांगितलं, की यंदा १.२५ कोटी रुपये कमाई झाली आहे. हा आकडा २०१९ मध्ये झालेल्या लिलावातील बोलीइतका आहे. लिलावाशिवाय लालबाग राजाच्या चरणी ५ कोटींहून अधिक रोख रक्कम दान करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवातील लालबाग राजाची एकूण कमाई ६.२५ कोटी रुपये इतकी आहे. लालबाग राजाला आलेल्या दानाचा लिलाव १५ सप्टेंबर रोजी झाला. या लिलावात १.२५ किलो वजनाचा मोठा सोन्याचा मोदक ६०.०३ लाख रुपयांना बोली लावून विकला गेला.

सोन्याच्या दागिन्यांची बोली

लालबाग राजा मंडळाचे कोषध्यक्ष मंगेश दळवी यांनी सांगितलं, की एक मोठा अतिशय सुंदर सोन्याचा हार ८.५५ लाख रुपयांना विकला गेला आहे. तर दुसरा आणखी एक सोन्याचा हार ३.२० लाख रुपयांना विकला गेला. एक किलो सोन्याच्या बिस्किटाची ५.७७ लाख रुपयांना विक्री झाली. लालबाग राजाला भेट म्हणून दिलेली एक बाईक एका खरेदीदाराने बोली लावत ७७००० रुपयांना विकत घेतली.

सोने-चांदीचं दान

यावर्षी लालबाग राजाला आलेल्या दानात अनेक प्रकारच्या सोने-चांदीच्या वस्तू दान करण्यात आल्या आहेत. गोल्ड प्लेटेड लालबाग राजाच्या पादुका, अनेक देवतांच्या सोन्याच्या मूर्ती, सोन्याचे लहान-मोठ्या आकाराचे अनेक मोदक, चांदीच्या समई, मौल्यवान धातूच्या दुर्वा, चांदीचे हार, बाप्पाच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या, दागिन्यांच्या विविध वस्तू अशा अनेक गोष्टींच दान करण्यात आलं आहे. गुरुवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२०० रुपये प्रति तोळा इतका होता, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. एक किलो चांदीचा भाव ५७००० होता. हेही वाचा – Lalbaugcha Raja 2022: पाच दिवसांत लालबाग राजाच्या चरणी भरघोस दान, आकडा पाहून हैराण व्हाल

शेवटच्या तीन दिवसांत भरघोस दान

यावर्षी राजाला आलेलं दान काहीसं कमी झाल्याचं बोललं जात आहे. गणेशोत्सव काळात २४ कॅरेट सोन्याचा दर ५२००० रुपये प्रति १० ग्रॅम होता, त्यामुळे यात कमी होऊ शकते. तसंच यंदाची एकूणच महागाई हेदेखील यामागचं कारण असल्याचं लालबाग राजा मंडळाचे कोषध्यक्ष मंगेश दळवी यांनी सांगितलं. शेवटच्या तीन दिवसांत दानात वाढ झाली. या तीन दिवसांत अंदाजे ५.५ किलो सोनं आणि ६० किलो चांदी इतकं दान करण्यात आलं.

२००८ मध्ये सर्वाधिक दान

२०१८ मध्ये लालबाग राजाला ८ कोटी रुपये दान आलं होतं. या रोख रकमेसह ५.५ किलो सोनं, ७५ किलो चांदी इतकं दान करण्यात आलं होतं. तर, २००८ या लालबाग राजाच्या ७५व्या वर्धापनदिनी सर्वाधिक एकूण उत्पन्न ११.५ कोटी इतकं झालं होतं. यावर्षी लालबाग राजाचं ८९वं वर्ष होतं. मागील दोन वर्षात करोनामुळे लालबाग राजाला आलेल्या दानाचा लिलाव करण्यात आला नव्हता. २०२० मध्ये करोना काळात या मंडळाने रक्तदान शिबिर, प्लाझ्मा कलेक्शन कॅम्प अशा प्रकारचे उपक्रम राबवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here