Gautam Adani Richest Man In India: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी सतत चर्चेत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलिनेयर लिस्टनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती १५५ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. अदानी यांची संपत्ती या वर्षात अशा वेगात वाढली, की ते थेट जगातील सर्वात श्रीमंत असलेल्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. इतक्या श्रीमंत असलेल्या गौतम अदानींनी आयुष्यात दोन अतिशय मोठ्या संकटांचा सामना केला आहे. यापैकी एक म्हणजे त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याशिवाय २००८ च्या मुंबई हल्ल्यावेळी ते ताज हॉटेलमध्ये होते, समोर मृत्यू दिसत असताना ते थोडक्यात बचावले होते.

अपहरण करुन ११ कोटींच्या खंडणीची मागणी

मूळचे अहमदाबादचे असलेले उद्योगपती अदानी यांनी त्यांच्या आयुष्यात अशा दोन कठीण परिस्थितीचा सामना केला आहे, ज्या ते थोडक्यात बचावले होते. ६० वर्षीय असलेल्या अदानींचं १९९८ मध्ये अपहरण करण्यात आलं होतं. त्यांच्याकडून १५ लाख डॉलर म्हणजे जवळपास ११ कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत शांतीलाल पटेल हेदेखील होते. पोलीस चार्जशीटनुसार, गौतम अदानी आणि शांतिलाल पटेल यांना बंदुकीचा धाक दाखवून १ जानेवारी १९९८ ला कर्णावती क्लबजवळ त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं.

अपहरणकर्त्यांनी कारमधून अज्ञातस्थळी आणलं होतं

हे दोघेही कर्णावती क्लबमधून बाहेर पडून आपल्या कारने पुढे मोहम्मदपुरा रोडकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यात एका स्कूटरने जबरदस्तीने त्यांची गाडी थांबवली होती. त्यानंतर अनेक लोकांनी एका व्हॅनमधून येऊन अदानी आणि पटेल यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना कारमध्ये बसवून एका अज्ञानस्थळी आणलं होतं. पण नशीब बलवत्तर त्यांना कोणत्याही खंडणीशिवाय, तसंच कोणतंही नुकसान न करता सोडून दिलं होतं. अपहरणकर्त्यांना पकडण्यात आलं, खटलाही दाखल करण्यात आला, पण २०१८ मध्ये त्यांना निर्दोष सोडण्यात आलं.

ताजमध्ये डिनर करताना बॉम्ब हल्ला

मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी अदानी ताज हॉटेलमध्ये होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यान अदानी डिनर करत होते. हल्ल्यावेळी ते बेसमेंटमध्ये लपले होते. त्यानंतर कमांडोंनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी त्यावेळी दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद सर्राफसह डिनर करत होते. त्यावेळी अंधाधुंद गोळीबार झाला, ग्रेनेड हल्ला झाला. त्यानंतर हॉटेल स्टाफच्या मदतीने त्यांना बेसमेंटमध्ये आणण्यात आलं होतं.

‘१५ फूट अंतरावरुन मृत्यू पाहिला’

अदानींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यावेळी बेसमेंटमध्ये आम्ही १०० हून अधिक लोक होतो. बेसमेंटमधूनच ते अहमदाबादमध्ये आपल्या कुटुंबियांशी बोलले होते. हॉटेलबाहेर त्यांचे कमांडो त्यांची वाट पाहत होते, पण ते कोणतीही मदत करू शकत नव्हते. २६ नोव्हेंबरची संपूर्ण रात्र अदानींनी ताजच्या बेसमेंटमध्येच घालवली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी २७ नोव्हेंबरला त्यांना सुरक्षारक्षकांनी बाहेर काढलं. त्यानंतर २७ नोव्हेंबरला ते आपल्या प्रायव्हेट एअरक्राफ्टने अहमदाबाद एअरपोर्टवर उतरले. या प्रसंगाविषयी बोलताना त्यांनी, मी १५ फूट अंतरावरुन मृत्यू पाहिला असल्याचं सांगितलं.

कॉलेज ड्रॉपआउट अदानींचा कोट्यवधींचा व्यवसाय

अदानींनी १९८० मध्ये (Gautam Adani) कॉलेज सोडून हिरा व्यवसायात आपलं नशीब आजमावलं होतं. त्यानंतर ते आपल्या भावाला त्यांच्या प्लास्टिकच्या व्यवसायात मदत करू लागले. १९८८ मध्ये अदानींनी एक्सपोर्ट्सची सुरुवात केली आणि इथूनच त्यांचं नशीब पालटलं. त्यांनी १९८८ मध्ये अदानी एक्सपोर्टअंतर्गत एक कमॉडिटी ट्रेडिंग व्हेंचर सुरू केलं. हे इतकं यशस्वी झालं, की ते दररोज चर्चेत येऊ लागले. १९९० च्या काळात अदानी प्रसिद्धीझोतात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here