डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेर गुडघाभर पाणी साचले होते.तर नादीवली भागात गुडघाभर पाणी साचले होते.कल्याण चिकणघर येथील काही भागात पाणी साचले होते.त्याचप्रमाणे वालधुनी नदी काठ परिसरात सुद्धा मुसळधार पावसाने पाणी साचले होते. दुपारच्या मुसळधार पावसाने कल्याण रेल्वे स्टेशन येथील ट्रॅकवर सुद्धा काही काळ पाणी साचले होते.
मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने कल्याण, टिटवाळा, डोंबिवली परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी आल्याने बहुतांशी रिक्षा चालकांनी प्रवासी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. कल्याणमधील बैलबाजार, डोंबिवली खाडी किनारच्या सखल भागात खाडीचे पाणी चढण्यास सुरुवात झाल्याने चाळी भागातील रहिवाशांनी घरातील आवश्यक सामानाची बांधाबांध करण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातून वाहत असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास उल्हास नदी इशारा पातळीजवळ पोहोचली होती. सायंकाळी चारच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १५.९० झाल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली. उल्हास नदीची धोका पातळी १७.५० मीटर इतर आहे. तर इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे.
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर धरण असून हे बारावी धरण ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागले होते. मात्र गेल्या 24 तासात बारावी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा एकदा उघडले आणि पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने बारावी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहापूर तालुक्यात येणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासाच्या कालावधीत भातसा धरण क्षेत्रात १४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणे सध्या ९९.३८ टक्के इतके भरले आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ६५० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.