गौतम अदानी यांनी सिमेंट क्षेत्रातील कंपनीचा व्याप त्यांचे पुत्र करण अदानी यांच्याकडे सोपवला आहे. करण अदानी यांची अंबुजा सिमेंटच्या बिगरकार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे एसीसीमध्ये बिगर कार्यकारी चेअरमनपदही देण्यात आलं आहे. करण अदानी सध्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे (एपीएसईझेड) सीईओ आहेत.
अदानी समूहानं गेल्या काही दिवसांत सिमेंट क्षेत्रात मोठे व्यवहार केले. सिमेंट उद्योगातील २ बड्या कंपन्या समूहानं खरेदी केल्या. त्यासाठी समूहानं जवळपास १०.५ अब्ज डॉलर मोजले. आता या उद्योगाची जबाबदारी गौतम अदानींनी त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा करणकडे सोपवली आहे. गेल्या दीड दशकांपासून करण अदानी बंदर क्षेत्रातील व्यवहार समर्थपणे सांभाळत आहेत. आता त्यांच्यासमोर सिमेंट क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचं आव्हान असेल.
दोन मोठे व्यवहार केल्यानंतर अदानींचा अंबुजा सिमेंटमधील हिस्सा ६३.१५ टक्क्यांवर पोहोचला. तर एसीसीमधील त्यांची भागिदारी ५६.६९ टक्क्यांवर (अंबुजाच्या माध्यमातून ५०.०५ टक्के भागिदारी) गेली आहे. अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांचं बाजार भांडवल १९ अब्ज डॉलर इतकं आहे.