धुळे : धुळे शहरात तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामध्ये गुंगीकारक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिळत नाही. मात्र अवैधपणे गुंगीकारक औषधांची विक्री करण्याचा व्यवसाय वाढला आहे. धुळे पोलिसांनी शुक्रवारी शाळा परिसरात मोठी कारवाई करत गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या घेऊन तौसिफ शाह सलीम शाह व अतुल कन्हैयालाल राणे हे दोघीही धुळे महापलिकेच्या जवळ असलेल्या शिवाजी शाळेजवळ सकाळच्या सुमारास आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या दोघांवर संशय आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळील मोटारसायकल आणि गुंगीकारक औषधांच्या बाटल्या असा जवळपास १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यासंदर्भात पो. कॉ. कमलेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तौसिफ शाह व अतुल राणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याआधीही धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या महिला व पुरुषांना ताब्यात घेतले होते. मात्र आता या गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या टोळीला आळा कसा घालायचा आणि या औषधांच्या विक्रीमागील मास्टरमाईंड कोण आहे, त्याच्यापर्यंत कसे पोहोचावे, असं आव्हान धुळे पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here