अकोला : अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील आगर येथून जवळच असलेल्या खेकडी इथे घडली आहे. तुकाराम मोतीराम बुध (वय ७५) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. अकोला जिल्ह्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत असून यावर चिंता व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मोतीराम बुध यांच्याकडे २ एकर शेत असून मोर्णा नदी परिसरात ही शेती आहे. त्यांनी या शेतजमिनीत यंदा खरीप पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आगर इथे कर्ज घेऊन लागवड केली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोर्णा नदीला आलेल्या पुरात कपाशीची बियाणे अंकुर अवस्थेत असतानाच सुपीक माती व पीक वाहून गेले. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुबार पेरणी करून मशागत केली. परंतु गेल्या दोन महिन्यांत संततधार पावसामुळे वेळोवेळी मोर्णा नदीला पूर सुरूच असल्याने पिकांची वाढ चांगली होत नसल्याचे पाहून ते चिंताग्रस्त झाले होते. या नैराश्यातून खचून जाऊन त्यांनी गावाशेजारीच असलेल्या काटेरी झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

नंदुरबारमधील विवाहितेचा दुसरा शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांकडून संशय व्यक्त

या संदर्भात मुलगा संतोष बुध यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रस्त्यावर चिखल, गावाच्या रस्त्यावर अंत्यसंस्कार

तुकाराम बुध यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, खेकडी या गावात स्मशानभूमी असून या गावातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा कच्चा आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत इथे जाता येत नाही. रस्ता कच्चा असल्यामुळे या मार्गावर प्रचंड चिखल असतो. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करता येत नाही. त्यामुळे गावाच्या रस्त्यावरच तुकाराम बुध या शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here