मुंबई: नामिबियाहून आणण्यात आलेले चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आफ्रिकन चित्ते देशात आणण्यात आले. तब्बल ७ दशकांनंतर भारतात चित्ते परतले आहेत.

वन्य प्राण्यांच्या प्रजाती पाहिल्यास चित्त्यांचा समावेश वाघ आणि सिंहांच्या परिवारात होतो. मात्र ते वाघांप्रमाणे डरकाळी फोडत नाहीत. ते सिंहांप्रमाणे गर्जनाही करत नाहीत. त्यांचा आवाज बकऱ्यांसारखादेखील नाही. चित्त्यांचा आवाज बऱ्याच अंशी मांजरींच्या आसपास जातो. मांजरींचा म्याव म्याव आवाजात फारसा दम नसतो. त्यांचा आवाज बराच पातळ असतो. मात्र चित्त्यांचा आवाज त्यांच्यापेक्षा दमदार असतो.

चित्ता वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे आवाज काढतो. मादी चित्ता आणि लहान चित्ता यांच्यातील संवादावेळी आवाज वेगळा असतो. त्यावेळी चित्त्यांचा आवाज काहीसा चिमणीसारखा असतो. सामान्य स्थितीत चित्त्यांचा आवाज मांजरांसारखा असतो. ज्यावेळी चित्त्याला धोका आढळून येतो, तेव्हा तो जोरजोरात आवाज करतो. त्याचा आवाज २ किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. आपल्या शत्रूसोबत संघर्ष करताना चित्त्याचा आवाज पूर्णत: वेगळा असतो. ढगांच्या गडगडाटावेळी जसा आवाज येतो, तसा चित्त्यांचा आवाज शारीरिक संघर्ष करताना येतो. ७० वर्षांनंतर चित्ता भारतात; ‘या’ राजाने केली होती देशातल्या शेवटच्या चित्त्याची शिकार
चित्त्याला वेदना होतात, त्यावेळी तो झुकून सापाप्रमाणे फुत्कारतो किंवा विव्हळतो. अनेकदा हा आवाज मिश्रित असतो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या जनावराशी संघर्ष करताना जखमी झाल्यास किंवा मरणाची चिंता सतावू लागल्यास तो दोन आवाज एकत्र काढतो. एखाद्याला संघर्षासाठी आव्हान देताना, आपल्या प्रदेशातून त्याला पळ काढण्याचा इशारा देताना चित्ता पुढचे दोन्ही किंवा एक पाय जमिनीवर आपटतो आणि थुंकताना जसा आवाज येतो, तसा आवाज काढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here