म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : रस्ते घोटाळ्यामध्ये दोषी ठरलेल्या व चौकशीनंतर तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या मे. आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंत्राटदाराने महापालिकेमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. नायर रुग्णालयाच्या टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका तब्बल ७१ कोटी ३० लाख ५७ हजार रुपये खर्च करणार आहे. प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील कलम ३५३ ब मधील तरतुदींनुसार ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करणे बंधनकारक आहे. या इमारती राहण्यासाठी योग्य/अयोग्य असल्याच्या तपासणीसाठी संरचनात्मक व स्थापत्य दुरुस्त्या करणे बंधनकारक आहे. नायर रुग्णालयाच्या टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयाच्या इमारतीला सुमारे ५०हून अधिक वर्षे झाल्याने सल्लागाराने दुरुस्तीची शिफारस केली होती. त्यानुसार मे. बी. जे. मेहता अँड असोसिएटसकडून इमारतीचे संरचनात्मक परीक्षण केल्यानंतर पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाने दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.

सचिवांना दिलेले विशेष अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे; शिंदे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

या कामासाठी मार्च २०२२ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात आठ कंत्राटदारांच्या निविदा प्रतिसादात्मक आढळल्या. एप्रिलमध्ये निविदेचे ‘क’ पाकीट उघडण्यात आल्यानंतर त्यात आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टस ही लघुत्तम निविदा असल्याने ती स्वीकारण्यात आली असून त्यानुसार प्रस्ताव बनवून तो पालिका प्रशासकाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ‘आरपीएफ इन्फ्रा प्रोजेक्टस’ हे पालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदार होते. २०१७ मध्ये पालिकेत झालेल्या रस्ते घोटाळ्यात दोषी ठरल्याने रस्ते विभागाने चौकशीनंतर २२ मार्च २०१७ पासून तीन वर्षांसाठी या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकले होते.

पालिकेत नव्याने नोंदणी

कंत्राटदाराचा दोष कालावधी मार्च २०२० रोजी संपल्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ मध्ये पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर या कंत्राटदाराचा व्यावसायिक ‘एसआरएम आयडी’ पुन्हा चालू करण्यात आला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले आहे. लघुत्तम निविदाकार असल्यास पालिकेत नोंदणी करून घेण्यासापेक्ष निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार निविदाकाराने २० जून २०२२ रोजी वर्ग १ (अ) मध्ये नोंदणी करण्याकरिता अर्ज केला आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने प्रस्तावात देण्यात आली आहे.

ही दुरुस्ती कामे होणार

खोदकाम, वाळवी प्रतिबंधक उपाय

पॉलिमर जॅकेटिंग, संरचनात्मक दुरुस्त कामे

वीट बांधकाम करणे

सिमेंट गिलावा करणे, रंगकाम

वॉटर प्रुफिंगची कामे

लादीकरण, छताचे काम करणे

स्ट्रक्चरल स्टीलचे काम

लाकडी व एफआरपी दरवाजांची कामे

अॅल्युमिनिअमच्या खिडक्यांचे काम

पाणीपुरवठा व मलनि:सारण सुविधा

साईन बोर्डस, बाह्य दुरुस्ती व विविध कामे

आवश्यक तोडकाम व पाडकाम

अग्निसुरक्षेसंबंधित कामे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here