पुणे : ‘महिलांना निवडणुकीत संधी दिल्यास काय होईल. मतदार स्वीकारतील का? निवडणुकीत आपले काय होईल, याची चिंता राजकीय नेत्यांना सतावते. त्याचवेळी महिलांना संधी देण्याबाबत मतदार, समाज जागरुकतेने भूमिका घेताना दिसत नाही. तरीही राजकारण्यांना मतदारांची अधिक भीती वाटते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणी व्यक्तींच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांविषयी भाष्य केले.

‘पुणे डॉक्टर्स असोसिएशन’तर्फे आयोजित सिंगल डॉक्टर फॅमिली कार्यक्रमात ते बोलत होते. एकच अपत्य आणि तिही मुलगी असताना अनेकांनी एकाच मुलीवर समाधान मानले. अशा कुटुंबीयांचा या वेळी सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जगताप, डॉ. सुनील जगताप या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री ते संरक्षणमंत्री या पदांवर असताना राज्यासह देशात महिलांबाबतचे धोरण कसे राबविले, याची माहितीही या वेळी पवार यांनी दिली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, शिवसेनेने पण तयारी केली, पण गेम फसला!

‘कर्तृत्व दाखविण्याचा मक्ता केवळ पुरुषांना असतो असे नाही. महिलांना संधी दिल्यास त्यादेखील कर्तृत्व दाखवू शकतात. महिलांमध्ये कर्तृत्व असते हे पुरुषांनी मान्य करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे,’ असा सल्ला पवार यांनी दिला. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी मिळाली. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतात. कामात सुधारणा होत असल्याचे ऐकायला मिळते आहे. महिलांच्या हाती बहुमत दिल्याचा हा परिणाम आहे,’ याकडेही पवार यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

‘माझ्यावरील संस्काराचे सर्व श्रेय माझ्या आईला आहे. तिने आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या कर्तृत्वाकडे पाहून महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. त्यामुळे आई, पत्नी, बहीण आणि मुलगी या सर्वांच्या कर्तृत्वाची दखल घेत गेलो,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

‘आईकडे खूप पेशन्स आहेत. वडिलांनी एका मुलीचा निर्णय घेतला त्या वेळी त्यांच्या निर्णयात आईचाही समावेश होता. त्यामुळे आईसारख्या अनेक होममेकर्स या आमच्यापेक्षा कर्तृत्ववान असतात,’ असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा ताकदीने छोटा पक्ष आहे. पण संसदेत पक्षाच्या राज्यसभेच्या चारपैकी दोन महिला सदस्य आहेत. राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून वंदना चव्हाण, फौजिया खान यांना काम करण्याची संधी मिळाली. अनेक मोठ्या पक्षाचे खासदारही त्यांच्याकडून कामकाज कसे करायचे हे शिकायचे म्हणतात. ही खूप मोठी ताकद आहे.’

‘सुप्रियाचे मला ऐकावे लागते…’

‘संघटनेत मतभेद होत नाहीत चर्चा होत असते. एकमेकांविरोधात मते मांडली जातात. पण सामूहिक मते लोकशाहीत स्वीकारावी लागतात. त्या वेळी एकत्रित काम करण्याची तयारी ठेवावी लागते. तेव्हा संघटनेत अडचणी येत नाहीत. सुप्रियाबाबत सांगणे अवघड आहे; पण हल्ली तिने सांगितलेले मला ऐकावे लागते,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची भावना पवार यांनी बोलून दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here