नाशिक शहर परिसरात बिबट्यांचा वावर नित्याचा झाला आहे. दररोज शहर परिसरात किंवा जिल्ह्यातील बिबट्या प्रवण क्षेत्र असलेल्या भागात हमखास बिबट्याचे दर्शन होते. दरम्यान, आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या व्हिडिओने खळबळ उडाली. सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबटे दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वनविभाग सतर्क झालं असून सध्या या व्हिडिओचा तपास सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशकात किंवा ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना किमान चार ते पाच बिबटे दिसून परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. सांगवी गावातील शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेताजवळचं नारळाच्या झाडावर बिबटे दिसले. सुरुवातीला एक बिबट्या हा नारळाच्या झाडावरुन खाली येण्याचा प्रयत्न करतोय. तो बिबट्या खाली येताच शेतात झाडाच्या खाली असलेला बिबट्या त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे वरती चढत असल्याचे दिसत आहे.