मुंबई : खासगी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे मुंबईत वाहतूक कोंडीच्या समस्येनं भीषण स्वरुप धारण केलं आहे. शहरातील पश्चिम द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतं. हीच कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेने नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिम परिसरातील सेनापती बापट मार्गावरील मच्छिमार कॉलनीचा रस्ता वांद्रे पूर्व भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात येणार असून यासाठी पालिकेने २३८ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
कसा असेल नवा पूल?
या पुलाची एक बाजू वांद्रे पूर्व भागातील कलानगर फ्लायओव्हरच्या जवळून सुरू होऊन पुढे मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाकडे जाईल. तर दुसरी बाजू सेनापती बापट मार्गावरून सुरू होऊन पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या पुलाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी माहिती महानगरपालिकेतील मुख्य अभियंता सतिश ठोसर यांनी दिली आहे.