तज्ञांचा अंदाज काय?
अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीनंतर जागतिक बाजार चिंताग्रस्त दिसत आहेत. यामुळे, डॉलरचा निर्देशांक ११० च्या आसपास पोहोचला आहे. व्यापारी आता अमेरिकन फेडरल फ्री मार्केट कमिटीच्या (FOMC) आगामी बैठकीच्या निकालाकडे लक्ष देऊन आहेत. तसेच इंग्लंडची मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडियाने देखील व्याजदराबाबत निर्णय जाहीर करणार आहे. याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदार महत्त्वाची भूमिका बजावतील, कारण परदेशी गुंतवणूकदार भारतीय इक्विटी मार्केटमध्ये विक्रेते बनले आहेत.
गेल्या आठवड्याची स्थिती
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ९५२.३५ अंक किंवा १.५९ टक्क्यांनी, तर निफ्टी ३०२.५० अंक किंवा १.६९ टक्क्यांनी घसरला. शुक्रवारी सेन्सेक्स १,०९३.२२ अंकांनी किंवा १.८२ टक्क्यांनी घसरून ५८,८४०.७९ वर बंद झाला. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, मजबूत आर्थिक डेटा असूनही भारतीय बाजारातील रोखे उत्पन्नाचा वाढता कल आणि डॉलर निर्देशांक यामुळे इक्विटी मार्केटमध्ये घसरण झाली.
अमेरिका आणि युरोपियन बाजार
अमेरिकेतील महागाई आणि बेरोजगारीच्या आकड्यांनी बाजाराच्या स्थितीवर मोठा परिणाम टाकला आहे. याशिवाय फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदरात मोठी वाढ करण्याचे संकेत देत कर्ज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी शेअर बाजाराच्या हालचालींवरही दिसून येत आहे. यामुळेच अमेरिकेच्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये समाविष्ट असलेल्या नॅसडॅकमध्ये शेवटच्या सत्रात ०.९५ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय बाजारही शेवटच्या सत्रात दबावाखाली दिसला. युरोपातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये समाविष्ट असलेला जर्मनीचा शेअर बाजार १.६६ टक्क्यांच्या, तर फ्रेंच शेअर बाजार १.३१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे, लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये शेवटच्या ट्रेडिंग सत्रात ०.६२ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली.