mns shivsena alliance, उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं सुरू होतं, त्यांच्यासोबत युती करू; कार्यकर्त्याच्या विनंतीवर राज ठाकरेंचा खुलासा – mns chief raj thackeray reaction on uddhav thackeray government and alliance with shivsena
नागपूर :मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आठ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज यांच्याकडून पक्षसंघटनेचा आढावा घेतला जात आहे. मात्र काल राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली. शहरातील प्रस्थापितांविरोधात संघर्ष करा, असा कानमंत्र राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे मनसे-भाजपच्या संभाव्य युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच मनसे आणि शिवसेनेतही एकत्र येण्याबाबत खलबतं केली जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या सर्व चर्चांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘नागपूर शहरातील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त करत आहे. घटस्थापनेवेळी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. पक्षस्थापनेच्या १६ वर्षानंतरही नागपूर शहरात मला पक्ष अपेक्षित असलेल्या स्थितीत उभा राहिलेला दिसत नाही. अनेक तरुण इच्छुक आहेत. त्यांना संधी दिली जाईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौरा करून पुन्हा दोन-तीन दिवसांसाठी मी नागपुरात येणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. रविवारी राज यांचं रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर स्वागतासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेल्वे स्टेशनपासून राज ठाकरे हे मुक्कामी असलेल्या हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंत रॅली काढण्यात आली. रविभवनमधील बैठकीत त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. पक्षाची शहरातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना बाहेर पाठवून कार्यकर्त्यांना आत बोलावून चर्चा सुरू करण्यात येत होती.