धुळे : गेल्या २४ वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रहिवाशी असणारी एक महिला घरातून बेपत्ता झाली होती. अखेर या महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात धुळ्याच्या सावली वृद्धाश्रमाला यश मिळाले असून आई आणि मुलांची तब्बल २४ वर्षानंतर भेट झाल्याचा सोहळा धुळ्यातील सावली वृद्धाश्रमात पार पडला.

१९९८ साली भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवाशी असणारी हिराबाई निखारे ही महिला पतीच्या निधनानंतर घरातून बेपत्ता झाल्या होत्या. या महिलेला लक्ष्मण आणि देवांग ही दोन मुले आहेत. हिराबाई घरातून बेपत्ता झाल्या त्यावेळी लक्ष्मण सात वर्षांचा तर देवांग चार वर्षांचा होता. हिराबाईचे पती अंतू निखारे यांच्या निधनानंतर मानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या हिराबाई घरातून बेपत्ता झाल्या होत्या. हिराबाई यांचा शोध घेण्याचा मुलांनी परिपूर्ण प्रयत्न केला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना कुठलाही शोध लागत नव्हता. घरातून बेपत्ता झाल्यानंतर हिराबाई या गेल्या अनेक वर्षे मनोरुग्णाच्या अवस्थेत बेवारसपणे विविध ठिकाणी फिरत होत्या. काही दिवस पैठण येथे राहिल्यानंतर या महिलेला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेली येथील एका वृद्धाश्रमात आणण्यात आले.

मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे कितीवेळा सांगाल, तुम्हाला संशय आहे का? रामदास कदमांचा हल्लाबोल
त्यानंतर हिराबाई निखारे गेल्या दोन वर्षांपूर्वी धुळे शहरातील सावली वृद्धाश्रमात आल्या होत्या. मनोरुग्ण असणाऱ्या हिराबाई निखारे यांची राहण्याची तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांची सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी पूर्णपणे व्यवस्था केली. हिराबाई यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले. या उपचारांना हिराबाईने बऱ्यापैकी प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना त्यांचे गाव कुटुंबीय आठवू लागले. २ सप्टेंबर रोजी हिराबाई निखारे यांनी सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांना कुटुंबाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी त्यांना आपले गाव आपले कुटुंबीय आपली मुले याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अप्पा खताळ यांनी धुळे जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून भंडारा जिल्हा पोलिसांशी संपर्क साधत हिराबाई यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. हा शोध घेण्यात आप्पा खताळ यांना यश मिळाल्यानंतर त्यांनी देवांग आणि लक्ष्मण यांना त्यांच्या आई बाबत माहिती देत त्यांना घरी घेऊन जाण्यासंदर्भात विचारणा केली. मुलांनी देखील आईला घरी घेऊन जाण्यास तयारी दर्शवल्यानंतर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हिराबाई निखारे यांना दोन मुले आणि दोन सुनांच्या स्वाधीन करत सावली वृद्धाश्रमाच्या संचालकांनी पाणावल्या डोळ्यांनी निरोप दिला. यावेळी वृद्धाश्रमाच्या वतीने साडी चोळी देऊन हिराबाई निखारे यांना निरोप देण्यात आला.

तब्बल २४ वर्षानंतर आई आणि मुलांची झालेली भेट पाहून यावेळी उपस्थितांचे देखील डोळे पाणावले. आईला घरी घेऊन जाताना आम्हाला अतिशय आनंद होत असून यापुढे आम्ही आईचा सांभाळ करु, अशी प्रतिक्रिया हिराबाई यांचा मोठा मुलगा लक्ष्मण याने व्यक्त केली.

इथे गडकरींचं गुणगान, तिथे प्रस्थापितांविरूद्ध लढण्याचा सल्ला; राज ठाकरेंवर सचिन खरातांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here