नागपूर : आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षबांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल पक्षबांधणीसाठी महत्त्वाच्या बैठकीत प्रस्थापितांशी लढण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. आज त्याच्याही पुढे जाऊन, जिथे जो कुणी प्रस्थापित असेल तिथे मनसे लढणार, असं सांगत एकप्रकारे विदर्भात भाजपविरोधात मनसेने रणशिंगच फुंकलं. राज ठाकरेंनी कोणतेही आढेवेढे न घेता थेटपणे होय, आम्हाला प्रस्थापितांशी लढावं लागेल, मग तो कोणताही पक्ष असो, असं सांगत महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे’ या त्यांच्या नाऱ्याला पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

राज ठाकरे यांनी काल दिवसभर स्थानिक नेत्यांशी चर्चा केली, विविध सेलच्या बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांशी हितगूत केलं. त्यानंतर आज राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे भाजप युतीचा उत्कंठावर्धक प्रश्न राज यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावेळी मैत्रीचे संबंध एकीकडे पण शेवटी राजकारण हे नात्यांवर नाही तर धोरणांवर, मुद्द्यांवर चालतं असं सांगत ‘कुणाही’विरोधात लढण्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. यावेळी त्यांनी भाजपही सोडलं नाही.

होय, आम्ही लढणारही अन् भिडणारही!

राज ठाकरे म्हणाले, “प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो, त्यावेळी तो प्रस्थापितांविरोधात लढूनच मोठा होतो. हा विदर्भ पहिल्यांदा ओळखला जायचा तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून. मग भाजपने प्रस्थापित काँग्रेसविरोधात लढा दिला आणि विदर्भ काबीज केला. म्हणजेच प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठं होता येतं. जर विदर्भात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल. राजकारण हे एकाबाजूला आणि मैत्रीचे संबंध हे दुसऱ्या बाजूला.. गडकरींची आणि माझी मैत्री ३५ वर्षांपासूनची आहे. राजकारण हे सतत सुरु असतं. राजकारण हे मुद्द्यांवर, धोरणांवर असतं. राजकारणातली टीका देखील मुद्दे-धोरणांवर असते. नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल”.

शिंदे-फडणवीसांच्या निर्णयावर राज ठाकरेंचा संताप; सरकारविरोधात पहिला मोठा हल्ला
मनसे-भाजप युतीच्या शक्यता मावळल्या?

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या गाठीभेटींनी राज ठाकरे बातम्यांच्या केंद्रस्थानी आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याच्या शक्यतांनी जोर धरला होता. मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद-नागपूर या महापालिका निवडणुकीत राज-देवेंद्र हातात हात घालून निवडणुका लढतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात मांडलेल्या ‘प्रस्थापितांविरोधात लढण्याच्या’ भूमिकेने या साऱ्या शक्यता सध्या तरी मावळल्या आहेत, असं म्हणावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here