सातारा | नंदुरबार : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून काही ठिकाणी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं असलं तरी कोरेगावमधील एका महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सातारा जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची समजली जाणाऱ्या खेड ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय झाला असून यामध्ये महेश शिंदे गटाला १२ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला मात्र ५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
नंदुरबार तालुक्यातील आष्टा गावाची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार आणि शिवसेना ( शिंदे गट) नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र डॉ. गावित यांच्या गटाने आष्टीच्या निवडणुकीत बाजी मारली असून शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे गेले होते.