मुंबई : शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी दापोलीच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे परिवारावर जोरदार ओसूड ओढले. त्यांनी उद्धव-आदित्य-रश्मी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. आजपर्यंत मातोश्रीला मंदिर मानणाऱ्या रामदास कदम यांनी ठाकरे परिवार अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या याच टीका-आरोपांवर विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.

राज ठाकरे यांनी काल दिवसभर नागपुरातील स्थानिक नेत्यांशी चर्चा केली, विविध सेलच्या बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांशी हितगूत केलं. त्यानंतर आज राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे भाजप युती-विदर्भ दौऱ्याचं प्लॅनिंग, शिंदे फडणवीस सरकार निर्मिती, फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाणं अशा विषयांवर राज ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिलं. पण ठाकरे परिवारावरील टीकेचा प्रश्न विचारल्यावर मात्र राज यांनी अधिक बोलणं टाळलं.

माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. एवढचं कशाला, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात रश्मी वहिनींचा समावेश कसा झाला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं, अशी खोचक टिप्पणी रामदास कदम यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर राज यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज जरासे भडकलेले पाहायला मिळाले. मी यावर काय उत्तर देऊ, रामदास कदम किंवा उद्धव ठाकरे नागपूरला आल्यावर त्यांना हा प्रश्न विचारा, असं म्हणत राज ठाकरे यांनी अधिक बोलणं टाळलं.

फडणवीसांशी लढणार का? भाजपशी दोन हात करणार का? तुमचं प्लॅनिंग काय? राज ठाकरेंचं रोखठोक उत्तर
राज ठाकरे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले

राज ठाकरे म्हणाले, “प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो, त्यावेळी तो प्रस्थापितांविरोधात लढूनच मोठा होतो. हा विदर्भ पहिल्यांदा ओळखला जायचा तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून. मग भाजपने प्रस्थापित काँग्रेसविरोधात लढा दिला आणि विदर्भ काबीज केला. म्हणून प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठं होता येतं. जर विदर्भात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल. राजकारण हे एकाबाजूला आणि मैत्रीचे संबंध हे दुसऱ्या बाजूला.. गडकरींची आणि माझी मैत्री ३५ वर्षांपासूनची आहे. राजकारण हे सतत सुरु असतं. राजकारण हे मुद्द्यांवर, धोरणांवर असतं. राजकारणातली टीका ही देखील मुद्दे धोरणांवर असते. नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here