वडील त्यांच्या मृत मुलाला समुद्रात फेकत असताना बोटीवरील सर्व जण अल्लाहू अकबर म्हणत होते. २७ ऑगस्टला ३२ प्रवाशांनी भरलेली बोट तुर्कस्तानच्या अंताल्या शहरातून इटलीच्या पोजालो इथे जाण्यासाठी निघाली. प्रवासाचं अंतर मोठं होतं. मात्र बोटीवर फारसं सामान नव्हतं. हळूहळू अन्नपाणी, पेट्रोल संपू लागलं. सगळं संपताच महिला आणि मुलांची प्रकृती बिघडू लागली. कोणालाच काही कळेना. जिवंत राहण्यासाठी समुद्राचं पाणी टूथपेस्टमध्ये मिसळून त्यांनी आपली भूक शमवली.
अन्नपाण्याअभावी ६ जणांची प्रकृती बिघडली. ३ महिला आणि ३ लहान मुलांना ताप आला. खायला काहीच नसल्यानं अशक्तपणा वाढला आणि त्यांनी प्राण सोडला. बोटीतील प्रवाशांनी त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. समुद्र किनारा गाठल्यानंतर त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कार करू, असा प्रवाशांचा मानस होता. मात्र प्रवास खूप लांबचा असल्यानं समुद्र किनारा येण्याआधीचे ६ जणांचे मृतदेह कुजू लागले.
मृतदेहांची स्थिती खराब होऊ लागल्यानं बोटीतील त्यांच्या कुटुंबीयांनी ते समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला. मृतदेह कपड्यांमध्ये गुंडाळून ते पाण्यात टाकण्यात आले. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक वडील आपल्या मुलाचा मृतदेह समुद्रात सोडताना दिसत आहेत. अन्नपाणी आणि इंधन संपलेली एक बोट पाण्यात अडकून पडल्याची माहिती मिळताच इटलीतील एक जहाज मदतीला आलं. त्यांनी बोटीवर अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केली.