मुंबई : विश्व मैत्री दिवसाच्या निमित्ताने भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे केला. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मनोमिलनाची तयारी दाखवली. पण कटकारस्थान रचून हेतूपुरस्सरपणे कुणी गुन्हा करत असेल तर अशा लोकांना क्षमा म्हणजे पुन्हा एकदा त्याहीपेक्षा भयंकर गुन्हा करण्यासाठीचा परवाना देण्यासारखे आहे, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

भारत जैन महामंडळ यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून त्यांचे आशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण क्षमा करण्यासाठी मोठं काळीज लागतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला. उद्धव ठाकरेंनी ‘पुनश्च हरिओम’ म्हणत मागील अडीच महिन्यांमधल्या घटना विसरुन ‘आवाज’ द्यावा, अशी अपेक्षाच एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांच्या मन की बातवर शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी मागितली, म्हणाले क्षमा करायला….
हेतूपरस्परपणे कुणी गुन्हा करत असेल तर….!

“नकळतपणे अजाणतेपणे चूक घडली तर निश्चितपणे अशा माणसाला क्षमा केली गेली पाहिजे. परंतु जर ठरवून कटकारस्थान रचून हेतूपरस्परपणे कुणी गुन्हा करत असेल तर अशा लोकांना क्षमा म्हणजे पुन्हा एकदा त्याहीपेक्षा भयंकर गुन्हा करण्यासाठीचा परवाना देण्यासारखे आहे”, असं म्हणत आम्ही परतीचे दोर कापले असल्याचंच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना सांगितलं.

“पाश्चात्य विचारवंत हॉब्स सांगतो की एक उत्कृष्ट राजकारणी आणि कुशल प्रशासक होताना चूक आणि गुन्हा यातला फरक समजावून घेऊन कुणाला क्षमा करायची आणि कुणाला शिक्षा करायची हे कळलेच पाहिजे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here