काय आहे संपूर्ण प्रकरण?
वाशिम पोलीस स्टेशनमध्ये सन २०१४ साली कळंबा महाली येथील वामन फकिरा महाले यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या मुलीला पांडुरंग गुलाबराव महाले या युवकाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान, या प्रकरणात तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी अनेकदा या गुन्ह्याचा तपास केला आहे. मात्र, त्यांच्या हाती निराशा आली. गेल्या ८ वर्षांपासून याचा सुगावा सुद्धा लागत नव्हता. यासारखे अनेक गुन्हे जिल्ह्यात पेडिंग असल्याने वाशिमचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून एक पथक गठित केलं. आणि यासारख्या गुन्ह्याचे तपास सुरू केले.
तपासा दरम्यान आठ वर्षाआधी दाखल असलेल्या अपहरण गुन्ह्यातील मुलगी शिर्डी इथे मिळून आली. तर मुलीला पळवून नेलेल्या युवकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय वाशिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असलेली एक मुलगी, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यात दाखल बेपत्ता असलेल्या तीन मुली, मानोरा पोलीस स्टेशनमधील एक मुलगी, जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत एक मुलगी आणि कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुह्यातील एका मुलीचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने जिल्ह्यातील ५४ मुलींपैकी ४५ मुलींचा शोध घेतला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, प्रभारी अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप निखाडे, विष्णू सूर्यवंशी यांनी केली आहे.