आमदार रावत यांनी विधानभवनाच्या आवारात थेट गायीसह प्रवेश केला. मात्र, विधानसभेत पोहोचण्यापूर्वीच रावत मीडियाशी बोलण्यासाठी थांबले. त्यानंतर गाय अचानक बिथरली आणि तेथून पळू लागली. गाय अचानक निघून गेल्याने आमदार पाहतच राहिले. गाय पळू लागल्याने विधानसभेच्या रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. यानंतर आमदार रावत यांना घेराव घालत काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. भाजपला गायीच्या नावावर राजकारण करायचे होते, मात्र गोमातेनेच त्यांच्या नौटंकीचा अंत केला, अशी टीका काँग्रेसने केली. सोशल मीडियावरही या घडामोडींची जोरदार चर्चा होत आहे.
आमदार सुरेश सिंह रावत यांनी हातात ‘गोमाता करे पुकार, हम बचाओ सरकार’ अशी पोस्टर्स घेऊन विधानभवन परिसरात प्रवेश केला. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकारांना सांगितले की, केंद्र सरकारने लंपी रोगाला राष्ट्रीय संकट म्हणून घोषित करावे. गाळीच्या त्वचेच्या आजारापासून गायींचे प्राण कसे वाचवता येतील, याला आमचे प्राधान्य आहे. केंद्राने लस आणि औषधे द्यायची आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही केंद्राकडे हे राष्ट्रीय संकट घोषित करण्याची मागणी करत आहोत, असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी म्हटले.
भाजप आमदार रावत काय म्हणाले?
ही घटना घडण्यापूर्वी रावत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गोमाता गेल्या तीन महिन्यांपासून लंपीच्या आजाराने त्रस्त आहे. मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना त्याचा त्रास होत आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण गाय घेऊन विधानभवनात पोहोचलो. सरकारने गायींची काळजी घेणे आवश्यक आहे. याआधीही रावत यांनी अशाच प्रकारे वेगळ्याच पद्धतीने वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आले आहेत.