मुंबईकरांना चांगले, सकस, सुरक्षित मांस, मासळी मिळणे आवश्यक असून त्यासाठी बाजार विभागातील विशेष दक्षता पथकावर महत्त्वाची जबाबदारी आहे. देवनार पशुवधगृहापासून ते इतरत्र चांगले मांस मिळावे यासाठी विशेष दक्षता पथक महत्त्वाची भूमिका बजावित असते. परंतु, १९९२पर्यंत प्रभावशाली असलेल्या विशेष दक्षता पथकाची अवस्था बिकट झाली आहे. त्यावेळी मुंबईतील पाचही प्रवेशद्वारावर २४ तास तैनात असणारी तीन पथके होती. या पथकामध्ये त्यावेळी चार सहायक अधीक्षक, २२ मुख्य निरीक्षक आणि २१० निरीक्षक होते. सध्या देवनार आणि बाजार विभागात ही संख्या केवळ २५पर्यंतच उरली आहे. एवढ्या कमी मनुष्यबळात अवैध व्यवसायावर नियंत्रण राखणे अवघड असल्याचे सांगण्यात येते. पालिकेचे अधिकारीही याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
आधी या पथकात मुख्य निरीक्षक, पाच निरीक्षक, दहा शिपाई अशी कर्मचारी संख्या असे. मात्र, सध्या केवळ २५ निरीक्षक बाजार विभाग आणि देवनार विभागाची जबाबदारी पाहत आहेत. लम्पीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जनावरांच्या आवक-जावकवर बंदी आणली आहे. तसेच बर्ड फ्लूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर नियंत्रण साधण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.
यापूर्वी, उच्च न्यायाल्याने जनावरांच्या कत्तलीनंतर निर्माण होणारा राडा रोडा थांबविण्यासाठी १८९ दुकानांमध्ये कत्तलीस मनाई केली होती. परंतु, मुंबईत बकरे, कोंबडीच्या मांसाची विक्री करणारी शेकडो दुकाने कोणत्याही निर्बंधांवाचून सुरू असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे. त्यातच पालिकेच्या बाजार विभागाने २०११पासून नवीन परवाना न दिल्याने अवैध दुकानाची संख्या वाढली आहे. तसेच, पालिकेसही लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.
मुंबईकरांच्या हितासाठी मुंबई पालिकेने बाजार विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतानाच शिल्लक पदे आणि पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ‘दि म्युनिसिपल युनियन’चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.
नवीन परवान्याचा अभाव
मुंबई पालिकेने २०११पासून नवीन परवाने देणे बंद केल्याने, सर्वच भागांत अवैध दुकानांची संख्या वाढली आहे. या सर्व नियंत्रणासाठी बाजार विभागातील विशेष दक्षता पथकाची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा कारवाईची तीव्रता वाढण्यासाठी पथकाकडे रिव्हॉल्वर, पोलिस सनद अधिकार देण्यात आले होते.