परभणी : ‘शिंदे-फडणवीस सरकार फक्त ४० बंडखोर आमदारांसाठी काम करत आहे. त्यामुळे भाजपच्या १०६ आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज आहेत. कारण ते मुख्यमंत्री होणार होते, पण तसं झालं नाही. हा सर्व प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी येथे राज्यातील नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जयंत पाटील यांनी परभणी शहरातील वसमत रोडवरील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले की, ‘पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम चालू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मी परभणी येथे आलो आहे. सभासद नोंदणी करण्याचं आवाहन जिल्ह्यातील सर्वांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली जाईल.’ दसरा-दिवाळीत गृहिणींना मिळणार मोठा दिलासा; उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता
सरनाईकांच्या मुद्द्यावरून तपास यंत्रणांना घेरलं
प्रताप सरनाईक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मागे लागलेली ईडी आता शांत झाली आहे. राजकीय धोरण आणि दिशा बदलली की या देशातील तपास यंत्रणा तुम्हाला संरक्षण देऊन मदत करतात, हेच चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाला दिसून आलं आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा चुकीचा वापर सुरू असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घेतल्यास आपला सुपडा साफ होईल, अशी भीती शिंदे-फडवणीस सरकारला वाटत आहे. त्यामुळेच निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचा जो घात करण्यात आला आहे, याबद्दल लोक आपल्याला प्रश्न विचारतील, अशी भीती सरकारला आहे. मला निवडणूक आयोगाचा कौतुक वाटतं की ते का निवडणूक घेत नाहीत. कारण आमचे सरकार होतं त्यावेळी निवडणूक घ्यायची घाई केली होती. आज तोच निवडणूक आयोग का गप्प आहे. हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे,’ असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.