जळगाव : पोटच्या मुलाला वैद्यकीय अडचणी उद्दभवल्या… देशातच नव्हे विदेशात अनेक दवाखान्यांमध्ये उपचार केले. मात्र, तरीही कायमचं गतीमंदत्व आलं. गतीमंद मुलगा अनेक ठिकाणी उपचार करुनही बरा झाला नाही. तसेच त्याचा सांभाळ करतांना किती असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, ही जाणीव डोळ्यासमोर ठेवून हर्षाली प्रवीण चौधरी यांनी रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. याठिकाणी त्या एक ते दोन नव्हे तर तब्बल ८० गतीमंद मुलांचा सांभाळ करत असून त्यांच्या आई बनल्या आहेत. इतकंच नाहीतर या गतीमंद मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी वेगवेगळ्या रोजगाराचे प्रशिक्षण देवून त्यांनी गतीमंद मुलांच्या पंखांमध्ये बळ भरले आहे.

​हर्षाली प्रवीण चौधरी यांच्या प्रेरणेला सलाम…

जळगाव शहरातील रहिवासी हर्षाली प्रवीण चौधरी यांचे फुड टेक्नॉलॉजी इन प्रीव्हेशन तसेच हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण झाले. त्या उत्कृष्ट शेफ आहेत. त्यांचे टीव्ही चॅनेलवर शो सुध्दा झाले आहेत. याचदरम्यान त्यांनी आर्ट अँड क्राफ्ट डिप्लोमा तसेच चिल्ड्रेन डेव्हलोपमेंट यात पदवुत्त्तर शिक्षण घेतले आहेत. ९ मे २००१ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नांनंतर त्यांच्या संसारच्या वेलीवर एक फुल फुलले. सर्व काही आनंदात सुरू होते. आनंदाला कुणाची नजर लागली देव जाणे.. २००६ मध्ये हर्षाली चौधरी यांचा मुलगा रुशील हा सात वर्षाचा असतांना त्याला अचानक वैद्यकीय अडचणी आल्या. शाळेत असतांना अचाकन त्याची प्रकृती बिघडली. तपासणीत त्याच्या मेंदुला इन्फेक्शन झाल्याचे समोर आले. त्याला देशातच नाही तर विदेशात अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल, स्पेशल कोर्सस, वेगवेगळ्या थेरीपी अगदी बोनमॅरो स्टेमसेल्स थेरीपी याप्रमाणे अनेक उपचार केले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्याचे गतीमंदत्व दूर करता आलं नाही.

​अशी झाली ‘उडाण फाऊंडेशन प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना…

रुशीलवर उपचार अन् त्याचा सांभाळ करताना किती अडचणी-संकटं आली, हे हर्षाली चौधरी यांनी जवळून अनुभवलं. एका दिव्यांग मुलासाठी होणारी धावपळ आणि त्यांना येणाऱ्या अडचणी हर्षाली चौधरी यांनी अगदीच जवळून बघितल्या. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात या स्पेशल मुलांच्या पालकांना सर्वच बाबतीत दुर्लक्षीत केले जाते. त्यामुळे या दिव्यांग बालकांच्या पालकांना जीवन नकोस वाटते. हे लक्षात आल्यावर हर्षाली चौधरी फार अस्वस्थ झाल्या.

​दिव्यांग मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय

सर्व उपचार मोठ्या शहरातच आहेत आणि अतिशय महाग आहेत. सर्वांनाच करणे शक्य नाही. तेव्हा दिव्यांगांच्या व्यथा, पालकांना येणाऱ्या अडचणी बघता हर्षाली चौधरी यांनी दिव्यांग मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांचे दीर, पती यांच्यासह कुटुंबियांनीही हर्षाली चौधरी यांना बळ दिलं. दिव्यांग मुलांना या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी काही पालकांना सोबत घेत हर्षाली चौधरी त्यांच्या मुलाच्या नावाने म्हणजेच रुशीलच्या नावाने रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनची स्थापना केली. आणि या अंतर्गत उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र उभारले.

​केंद्रात गतीमंद मुलांना स्पीच थेरपी आणि स्पेशल एज्युकेशन

घरीच दोन मुलांसाठी सुरू झालेल्या उडाण दिव्यांगअर्ली इंटर्व्हशन सेंटरमध्ये ० ते ६ वयातली ३० तर उद्योग प्रशिक्षण केंद्रात ५० मुले-मुली प्रशिक्षण घेत आहेत. शहरात स्वतंत्र इमारतीमध्ये गतीमंद मुलांसाठी क्लासरुम, प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिक्षणाची व्यवस्था, किचन रुम, भव्य असा हॉल, विविध वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र खोली. या पध्दतीने हे उडाण फाउंडेशनचे काम सुरु आहे. प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे दिव्यांगांचा सामाजिक, बौद्धीक, शाररिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे हाच उडाण दिव्यांगचा मुख्य उद्देश आहे. या स्पेशल मुलांना स्पीच थेरपी, रीमिडीयल, फिजीओ थेरपी, स्पेशल एज्युकेशन अशा विविध ट्रिटमेन्ट दिल्या जातात. इतकंच नाहीतर उडान दिव्यांग साहायता केंद्रात दिव्यांगाच्या कुठल्याही अडचणीवर मदत केली जाते.

​विविध वस्तू तयार करण्याचेही दिले जाते प्रशिक्षण…

उडाण फाउंडेशनच्या वतीने सण-उत्सवांना अनुसरून अनेक कार्यक्रम आयोजित करून दिव्यांगाना व्यासपीठ देते. याठिकाणी चॉकलेट, बुके, अगरबत्ती, कंदील, तोरण, पणत्या, पतंग, दिवे अशी साधारण ७० उत्पादने उडाणमध्ये तयार होतात. ते वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणही या गतीमंद मुलांना दिले जाते. मुलांच्या हातून तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. याद्वारे ही मुले रोजगार क्षम होत असून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना मदत होत आहे. आतापर्यंत काही मुले स्वत:च्य पायावर उभी सुध्दा झाली असून सामान्य माणसांप्रमाणे ते सुध्दा समाजात वावरत आहेत.

​लवकरच उत्तर महाराष्ट्रातील पहिलं EIC सेंटर सुरू करणार…

-eic-

बालकांवर योग्य वेळी उपचार झाले तर ते नॉर्मल होऊ शकतात. अशा जन्माला आलेल्या बाळापासून ते सहा वर्ष वयोगटाच्या बालकांवर निदान तसेच उपचारासाठी भव्य असं ईआयसी सेंटर सुरू करणार असल्याचंही उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलंच ईआयसी सेंटर असेल असेही त्यांनी सांगितलं. गतीमंद मुलांसाठीच्या उपक्रमाला आता दोनच हातच जुळले आहेत. स्वखर्चावर उडाण फाउंडेशन काम करत असून याकडे शासनानेही सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष द्यावे तसेच निधी उपलब्ध करुन द्यावा. या उपक्रमाला असंख्य हात जुळले तर देशातील लाखो गतीमंद मुलांचा विकास साधता येईल, असं आवाहनही हर्षाली चौधरी यांनी व्यक्त केलं. या गतीमंद मुलांसाठीच्या या कार्यामुळे हर्षाली चौधरी ह्या आजच्या आधुनिक काळातील सिंधुताई सपकाळ ठरल्या आहेत, असे म्हटले तरी अतिशोक्ती ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here