Ahmednagar shivsena news, १० नगरसेवक फुटण्याची चर्चा; उद्धव ठाकरेंची शिवसेना थेट महापालिकेतील सत्ता गमावणार? – another 8 to 10 corporators of shiv sena in ahmednagar municipal corporation are likely to support chief minister eknath shinde group
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर आमदार आणि खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असल्याचं चित्र आहे. अशातच अहमदनगर महापालिकेतील शिवसेनेचे आणखी आणखी ८ ते १० नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी थोडा वेळ मागितला आहे, असा दावा शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केला आहे.
अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे २३ नगरसेवक आहेत. त्यापैकी सध्या पाच नगरसेवक शिंदे गटात आहेत. आणखी आठ ते दहा नगरसेवक गेल्यास शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेनाच्या रोहिणी शेंडगे महापौर आहेत. शेंडगे विजयी झाल्या, त्यावेळी शिवसेना २३, राष्ट्रवादी १८, काँग्रेस ५ अशी स्थिती होती. भाजपचे १५ नगरसेवक आहेत. एकूण ६८ जागा असलेल्या या महापालिकेत ३४ हा बहुतमाचा आकडा आहे. शिवसेनेत आणखी फूट पडली तर सत्ताही धोक्यात येऊ शकते, अशी स्थिती आहे. मुळात पूर्वी येथे भाजपची राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेकडून मागणी झाल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीही मूळ शिवसेनेसोबत राहण्यास फारशी इच्छुक नसल्याचे पूर्वी आढळून आले आहे. आता शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढल्यास सत्ता समीकरणे पुन्हा बदलू शकतात. नारायण राणेंना मोठा धक्का: कोर्टाने याचिका फेटाळली; २ आठवड्यांत बंगल्यातील बेकायदा बांधकाम तोडलं जाणार
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी पत्नी शीला शिंदे तसेच सुरेखाताई कदम व रोहिणी शेंडगे यांना महापौर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर आहे. मात्र, अन्य काही जण का त्यांच्याबरोबर नाहीत, हे मला सांगता येणार नाही. पण महापालिकेतील सचिन जाधव, अक्षय उनवणे, संग्राम शेळके, सुभाष लोंढे व मी स्वतः असे शिवसेनेचे पाच नगरसेवक आणि माजी नगरसेवक अनिल लोखंडे व काका शेळके आम्ही मुख्यमंत्री शिंदें यांच्यासमवेत आहोत. मनपातील शिवसेनेचे आणखी आठ ते दहा नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. तो त्यांना दिला आहे. त्यामुळे ते आमच्यासमवेत येणार हे नक्की आहे. त्यामुळे आमची ताकदही शहरात वाढणार आहे, असेही अनिल शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दसर्याच्या दिवशी मुंबईत सभा होणार आहे. त्या सभेसाठी नगरमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत. त्यासाठी बुधवारी बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह खासदार राहुल शेवाळे व आमदार अनिल बाबर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी दिली.