मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका खेडी या गावात महिनाभरापूर्वी पूर्वी तमाशाचा कार्यक्रम झाला होता. यात्रा कार्यक्रमात सहाय्यक फौजदार असलेला कर्मचारी चक्क नृत्य करताना तसेच पैसे ओवाळताना दिसून आला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सहाय्यक फौजदार भटू विरभान नेरकर असे तमाशाच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख किरणकुमार बकाले हे मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गोत्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. बकाले यांच्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा खालावली असतांना पुन्हा एका सहायक फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी भटू विरभान नेरकर या सहायक फौजदाराला निलंबित केले आहे.
गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात झालेल्या भावेश पाटील या तरुणाच्या हत्येने जळगाव हादरले होते. या प्रकरणी खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील संशयित भूषण सपकाळे याच्या गावातील तमाशात सहाय्यक फौजदार भटू नेरकर हा आपल्या एका सहकार्यासह नाचला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याच व्हिडीओत भूषण सपकाळे हा देखील नाचत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.