Vedanta Foxconn : महाराष्ट्र गुंतवणुकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु, आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला? हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले? अशी विचारणा संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

कोल्हापूर जिल्हा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात आज निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात 1.58 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास 90 टक्के चर्चाही केली होती, पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून 1 लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा प्रश्न राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडचा आहे.

तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यग्र आहेत. त्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा, पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते, तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता असा टोलाही निवदनातून लगावला आहे.  

हे का झाले याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता, असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जातायत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाच पाहिजे. अन्यथा राज्यसरकारला याची खुप मोठी किंमत मोजावी लागेल, असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here